एसटी कर्मचा-यांसाठी खुशखबर : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्र्यांची घेाषणा ! !

Santosh Gaikwad June 14, 2023 11:20 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचा-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे आज एसटी महामंडळाचा वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. 


शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत. तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.


महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जून ते सोन अस म्हटले जाते. एसटीची सेवा सुधारत चालली आहे. नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो गाडीचा पत्रा निघाला असेल तर त्याला दुरुस्त करत जावा. जेणेकरून अपघात होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील टोला लगावला. मोफत प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे विरोधी पक्षाला जरा भीती वाटत आहे, असे शिंदे म्हणाले.


एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली

एसटीची पहिली फेरी १ जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली होती. या घटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा केला जात आहे. १ जून रोजीच एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली होती. त्यामुळे या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षाला एसटी महामंडळाच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे.