'अग्निवीर' अक्षय गवते यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयाची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !

Santosh Gaikwad October 26, 2023 09:40 AM


  मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

 

बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सिचायिनमध्ये वीरमरण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती. अक्षय गवते हे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावातील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात भरती झाले होते.