मुख्यमंत्री जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’

Santosh Gaikwad September 20, 2023 05:49 PM


मुंबई, दि. २० : व्हॉटसअॅप हे जनसामान्यांपर्यंत पोहचण्याचे महत्वाचे संवादाचे साधन असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्रयांबरोबरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनतेत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. 


जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या ‘व्हॉटसॲप’ने चॅनेलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र चॅनेल सुरु करण्यात आले आहे. प्रमाणित असलेल्या या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनेल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी चॅनेलला फॉलो केले आहे.  


मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, पाच विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.  मुख्यमंत्री  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ही अंमलबजावणी करताना शासनाच्या योजना तसेच निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्यांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी लोकाभिमुख योजना, विकास प्रकल्पांची अचूक आणि वस्तूनिष्ठ माहिती, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री   शिंदे यांनी सदैव जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे, आता हातातील स्मार्ट फोनवर थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची, शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने हा संवाद अधिक प्रभावी होणार आहे.


            मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, थ्रेडस, कू, टेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इनस्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो. व्हॉटसॲपने गेल्या आठवड्यात चॅनेलची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने कंपनीकडे संपर्क केला आणि ‘CMO Maharashtra’ या नावाने स्वतंत्र, प्रमाणित चॅनेलचा काल ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही तासांतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या चॅनेलचे अनुसरण केले आहे.