मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश आज येथे दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रूग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार व वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेवू नये. धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. शिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण आणि समन्वयासाठीही प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
*ऑनलाईन माहिती भरणे सक्तीचे*
धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या आणि महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
*रूग्णालयात डॅशबोर्ड आणि फलक*
राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतची माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रूग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती जाहिररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रूग्णांना मदत होणार आहे. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
*आतापर्यंत ७ हजार ३७१ रूग्णांवर उपचार*
धर्मादाय रूग्णालय कक्षाची स्थापना २०२३ रोजी झाली असून आतापर्यंत १० हजार ७३८ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ७ हजार ३७१ रूग्णांवर उपचार झाले असून २४ कोटी ५३ लाख रूपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.