शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ येत्या ५ जानेवारीला पुण्यात

Santosh Gaikwad December 05, 2023 10:11 PM


मुंबई – दि.५ डिसेंबर – (श्रीराम खाडिलकर याजकडून) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे नियोजित संमेलनाध्यक्ष  डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून समारोप सोहळा मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे होणार आहे, अशी घोषणा नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष उदय सामंत यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केली. 

या शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. शरद पवार असून मुख्य निमंत्रक मा. उदय सामंत आहेत. नाट्य संमेलनाच्या शुभारंभ प्रसंगी ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज पूजन होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या काळात महाराष्ट्रातल्या अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलने होणार आहेत. 

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा तपशीलवार कार्यक्रम असा आहे. – दि. ५ जानेवारी २०२४ रोजी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे होणार असून दि. ६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. तसेच दि. ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नाट्य परिषदेच्या महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० - २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर येथे, दि. २७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर येथे,, दि. ४ फेब्रुवारी २०२४ बीड येथे, दि. १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर येथे,, दि. १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर येथे  आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.   

शतक महोत्सवी  नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी  मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात  खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादर केले जातील. 

या शतक महोत्सवी नाट्य संमेलनाला रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी केले आहे.