मंत्रिमंडळ निर्णय : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना दिलासा, यंदा मालमत्ता कर वाढ नाही

Santosh Gaikwad February 05, 2024 10:09 PM

 

मुंबई, दि.५: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी यंदा कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांवरील सुमारे ७३६ कोटी रुपयांच्या कराचा वाढीव आर्थिक भार यामुळे टळणार आहे.


राज्यसभा, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकां तोंडावर आल्याने सत्ता राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना गोंजारण्यास सुरुवात झाली आहे. विविध योजना आणि आश्वासनांची खैरात केली जात आहे. मुंबई महापालिकेने देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्तासहित कोणतीही करवाढ लादलेली नाही. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले.


भांडवली मुल्याधारीत करप्रणाली बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची अंमलबजावणी करून अंतिम देयके मिळावीत याकरीता करदात्यांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या प्राप्त झालेल्या होत्या. कर निर्धारण व त्यानुषंगाने मालमत्ता कराबाबतची सुधारित देयके कायद्यात सुधारणा केल्यानंतर द्यावी लागणार आहेत. त्यानुषंगाने मुंबई महानगरपालिका अधिनियम,१८८८ या कायद्यात प्रलंबित असलेली सुधारणा विचारात घेता, २०२३-२४ मध्ये भांडवली मुल्य सुधारीत न करता  मुंबईतील करदात्यांना सवलत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील अध्यादेश लवकर काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


दर पाच वर्षानी महापालिकेकडून मालमत्ता करात वाढ केली जाते. २०१५ मध्ये मालमत्ता करात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. २०२० मध्ये करवाढीचा प्रस्ताव होता. मात्र, कोरोना संकटामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोणतीही करवाढ केली नव्हती. तर कोरोनानंतर सत्तानाट्य आणि राजकीय गदारोळात करवाढीचा प्रस्ताव रखडला होता. यंदा लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आली असल्याने करवाढ केल्यास मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या निवडणुकानंतर मुंबईकरांवर ५ टक्के मालमत्ता करवाढीचा पडण्याची शक्यता आहे