बॉम्बे जिमखानाने विजेतेपद पटकावले

Santosh Sakpal May 06, 2023 10:57 PM

मुंबई : यजमान क्लब बॉम्बे जिमखान्याच्या अयाज बिलावाला आणि शैलेश दागा या अव्वल मानांकित जोडीने पहिला गेम गमावल्यानंतरही धडाकेबाज पुनरागमन करत गौतम लाऊड (बॉम्बे जिमखाना) आणि मंगरिश पालेकर (विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब) यांच्यावर चुरशीच्या अंतिम लढतीत ११-२१, २३-२१, २२-२० अशी मात करत ४५व्या जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतरक्लब बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

आदित्य बिर्ला सनलाइफ पुरस्कृत बॉम्बे जिमखाना कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत बॉम्बे जिमखाना ए संघाने एलिट टीम चॅम्पियनशिपवरही नाव कोरले. त्यांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टायगर्स संघाचा २-१ असा पराभव केला. बॉम्बे जिमखान्याच्या डीआने रॉड्रिग्स हिने कांदिवली, एमसीएच्या पालकन दवे हिच्या साथीने खेळताना महिलांच्या कॉम्बिनेशन ७५+ स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. तसेच डिआने हिने आपली सहकारी पालकन हिच्यासह खेळताना अव्वल मानांकित किरण शेटे (एमएलडब्ल्यूबी) आणि प्रिया आंबेकर (एमसीएफ) या जोडीचा २१-१२, २१-१२ असा सहज परा‌भव करून महिलांच्या ८०+ कॉम्बिनेशन गटाचे जेतेपद संपादन केले होते.

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या मंगरिश पालेकर याला दीपक जेटलीसह खेळताना प्रसाद शेट्टी आणि राजेश भानुशाली यांच्याकडून पुरुषांच्या ८५+ कॉम्बिनेशन गटात २१-१६, १३-२१, १२-२१ असा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.

निकाल (सर्व अंतिम फेरी) :

एमडी ४५ (अंतिम फेरी) : अयाज बिलावाला/शैलेश दागा विजयी वि. गौतम लाऊड/मंगरिश पालेकर ११-२१, २३-२१, २२-२०.

महिला कॉम्बिनेशन ७५+ : डिआने रॉड्रिग्स/पालकन दवे विजयी वि. किरण शेटे/प्रिया आंबेकर २१-१२, २१-१२

पुरुष कॉम्बिनेशन ८५+ : प्रसाद शेट्टी/राजेश भानूशाली विजयी वि. दीपक जेटली/मंगरिश पालेकर १६-२१, २१-१३, २१-१२

टीम चॅम्पियनशिप एलिट : बॉम्बे जिमखाना ए विजयी वि. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टायगर्स २-१.