बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना अखेर पदावरून हटवलं.., आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा !

Santosh Gaikwad March 18, 2024 05:53 PM

 

मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. या कारवाईनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर (ट्विटर) उशीरच झाला पण निदान योग्य निर्णय झाला, असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलारासू यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला आहे. परंतु, अद्यापही त्यांची बदली करण्यात आलेली नव्हती. मात्र, आज (18 मार्च) अखेरीस चहल यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने शिंदे सरकारला पत्र पाठवत चहल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याची आठवण करून दिली होती. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चहल यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत महायुतीच्या सरकारवर टीकास्त्र सोडले.


आदित्य ठाकरेंचे ट्वीट

“निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मिंधे सरकार गप्पच राहिले. अखेर निवडणूक आयोगाने आज मुंबईच्या आयुक्तांना हटवले. उशीरच झाला पण निदान योग्य निर्णय झाला. तरीही मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी केली जावी आणि जनतेच्या कराच्या पै अन् पै चा हिशोब केला जावा अशी आमची मागणी आहे”, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले.