भाजपचं राज्यात ऑपरेशन लोटस ? ; राजकीय घडामोडींना वेग !

Santosh Gaikwad April 18, 2023 01:58 PM


मुंबई: लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे असं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे


आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखला असल्याची माहिती मिळत आहे.त्यानुसारच राज्यात ऑपरेशन लोटस राबविले जात असल्याची माहिती मिळत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत 53 पैकी 40 आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे.  योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.यामध्ये अजित पवार यांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी अजितदादांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही असंही त्या वृत्तात म्हंटलं गेलं आहे. त्यामुळे भाजपचा प्लॅन किती यशस्वी होतो हे पाहावं लागणार आहे.

 चर्चेला अजिबात महत्त्व नाही;  शरद पवार

शरद पवार म्हणाले, ही जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू इच्छितो की, राष्ट्रवादी पक्ष आणि या पक्षात काम करणारे सर्व सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. यापेक्षा दुसरा कोणताही विचार कोणाच्याही मनात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

 या  चर्चेत तथ्य नाही :  अजित पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. या चर्चांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशामध्ये अजित पवार यांनी या चर्चांवर एका टीव्ही चॅनेल प्रतिक्रिया दिली आहे. 'नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, त्यात काहीच तथ्य नाही', असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.