बीएमसीत भूषण गगराणी, ठाण्यात सौरभ राव आणि नवी मुंबईत कैलास शिंदेंची आयुक्तपदी नियुक्ती

Santosh Gaikwad March 20, 2024 06:14 PM


 मुंबई :  मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी तर, कैलास शिंदे यांची  नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य शासनाने त्यांची बदली केली होती. मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही महापालिकेच्या रिक्त असलेल्या जागेवर नव्या महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे असून सध्या ते मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव होते. तसेच, कैलास शिंदे हे सध्या सिडकोमध्ये सह संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच, सौरभ राव हे यापूर्वी राज्याच्या सहकार आयुक्तपदी कार्यरत होते. इकबाल सिंह चहल यांना सध्यतरी नवीन पदभार देण्यात आलेला नसून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही वेटींगवरच ठेवण्यात आलेले आहे.  महाराष्ट्र सरकारने मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर या तीन IAS अधिकाऱ्यांची नावे सुचवली होती. त्यापैकी भूषण गगराणी यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले.

डॉ. अमित सैनी यांनी पदभार स्वीकारला

 मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अमित सैनी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला.  डॉ. सैनी यांनी एम. बी. बी. एस. (मेडिसीन) पदवी संपादीत केली आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील सन २००७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. डॉ. सैनी यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर बुलढाणा येथे सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नागपूर येथे कार्यरत असताना विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव या पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी पाहिला.  त्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तसेच, मुंबई येथे विक्री कर विभागात सह आयुक्त पदावर कामकाज पाहत असताना महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी हाताळला. नंतर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे ते जल जीवन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत होते.
 
 अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) म्हणून   अभिजित बांगर यांनी आज (दिनांक २० मार्च २०२४) सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)   आश्विनी भिडे यांच्‍याकडून  बांगर यांनी हा पदभार स्‍वीकारला.  बांगर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अॅंड इकॉनॉमिक्‍स येथून एम. ए. (अर्थशास्‍त्र) ही पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादीत केली आहे. प्रशासकीय सेवेच्या प्रारंभी  बांगर यांनी माणगाव (जिल्हा रायगड) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने  बांगर यांनी पालघर, अमरावती या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तेथून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ही पदे सांभाळल्यानंतर अलीकडे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्हणून ते कामकाज पाहत होते.