आरएमएमएस चषक क्रिकेट: नानावटी हॉस्पिटल विजेता

Santosh Sakpal May 31, 2023 03:40 PM

        मुंबई, :  आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक ‘ए’ डिव्हिजन  आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नानावटी हॉस्पिटलने जिंकले. अष्टपैलू प्रतिक पाताडे, ओंकार जाधव, दिनेश पवार यांच्या आक्रमक खेळामुळे  नानावटी हॉस्पिटलने बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा ८ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, शिवाजी काळे, चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव. संदीप देशमुख व डॉ. परमेश्वर मुंडे यांचा विशेष सत्कार आणि गौरवमूर्ती क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांचे अभिष्टचिंतन रुग्णालयीन क्रिकेट संघ व आयडियलतर्फे करण्यात आले.  

   शिवाजी पार्क मैदानात नानावटी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर अमोल तोरस्कर (२४ चेंडूत ३३ धावा) व डॉ. मनोज यादव (३३ चेंडूत २७ धावा) यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटलला पहिल्या विकेटसाठी  ६० धावांची सलामी भागीदारी करून दिली. परंतु त्यानंतर नानावटी हॉस्पिटलच्या ओंकार जाधव (२० धावांत ३ बळी) व फरहान काझी (१८ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी केल्यामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला २० षटकात ७ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित सोमार्डेने २० चेंडूत नाबाद २४ धावा फटकावून धावसंख्या वाढविण्याचा उत्तम प्रयत्न केला. अष्टपैलू प्रतिक पाताडे (३८ चेंडूत नाबाद ५१ धावा), दिनेश पवार (२२ चेंडूत ३५ धावा) व ओंकार जाधव (२१ चेंडूत २६ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे नानावटी हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १५.५ षटकात २ बाद १३२ धावांसह पार केले. डॉ. हर्षद जाधव व सुशांत गुरव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. स्पर्धेमध्ये सुशांत गुरवने सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा, किशोर कुयेस्करने उत्कृष्ट फलंदाजाचा, फरहान काझीने उत्कृष्ट गोलंदाजाचा तर प्रतिक पाताडेने विशेष पुरस्कार पटकाविला.   


 **********************************************