अमरावतीत मैदानावरून वाद चिघळला, बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वादावादी

Santosh Gaikwad April 23, 2024 06:36 PM


अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून अमरावतीमध्ये राडा झाला आहे.  मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू झाला आहे. अमरावतीचं सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी दि २३ आणि २४ अशा दोन तारखेला बुक केलेलं आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी अमित शाह सभा घेणार आहेत. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान ताब्यात घेतलं आहे. त्यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी झाली.   

अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान पार पडेल, त्यामुळे 24 एप्रिलला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवनीत राणा यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. पहिले आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू संतापले. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. तसेच पोलिसांनी आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत, त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं होतंय असा आरोपही बच्चू कडू यांनी केला. 

पोलिसांसमोरच परवानगीचं पत्र फाडलं

पोलिसांसमोरच बच्चू कडूंनी सभेच्या परवानगीचं पत्र फाडलं. अमित शाहांच्या सुरक्षेचं कारण देऊन आमची सभा रद्द करता, तुम्ही कायद्या बाबत बोलू नका, तुम्ही कायदा चुलीत घातला असा संताप बच्चू कडूंनी व्यक्त केला. पोलिसांच्याबद्दल सामान्य लोकांमध्ये आदर असताना तुम्ही त्याची किंमत घालवताय असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का?


ज्या ठिकाणी आपल्याला सभेसाठी परवानगी देण्यात आली होती, त्याची कागदपत्रेही असताना त्याच मैदानावर आता अमित शाहांच्या सभेला परवानगी कशी काय मिळते असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना केला. पोलिसांच्या गाड्यांवर भाजपचे झेंडे लावा, तुम्ही भाजपसाठी काम करताय असे खडे बोल बच्चू कडू यांनी पोलिसांना सुनावले. सुरक्षेच्या कारणास्तव अमित शाह कायदा आणि सुव्यवस्था मोडणार का असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. पोलिस त्यांचे काम करत नसून भाजप पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्याचा आरोप बच्च कडू यांनी केला.
 
परवानगी असतानाही आता ती रद्द केल्यानंतर आम्ही काहीतरी राडा करावा आणि त्यानंतर आम्हाला अटक करावी असा भाजपचा प्लॅन असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. सुरक्षेचं कारण देऊन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा डाव भाजपचा आहे. आमचे प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे जिंकणार असल्यानेच भाजपने आता हे सर्व सुरू केलं आहे. उद्या आम्ही याच ठिकाणी सभेसाठी लाखांच्या गर्दीने येणार असून जर परवानगी दिली नाही तर उपोषण करणार अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला.