बाबरी पाडली तेव्हाचे उंदीर खंदकातून बाहेर येत आहेत : उध्दव ठाकरेंचा घाणाघात

Santosh Gaikwad April 11, 2023 04:27 PM

मुंबई :  बाबरी मशीद पाडण्यात एकही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता असे वक्तव्य भाजपचे नेते व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते.  श्रेय घेण्यासाठी उंदरं बिळातून बाहेर येतायेत , असं म्हणत ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही पत्रकार परिषदेतून टीका केली आहे.  


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजपकडे शौर्य नव्हतं त्यावेळी मुंबई शिवसेनेनी वाचवली आहे. त्यावेळी पंतप्रधानांचं नााव देखील कुठेही नव्हतं.  बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली.  बाबरी मशिदीबाबत ही बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत.  जे मिंधे सत्तेसाठी लाचारी करून लाळघोटेपणा करत गेले त्यांनी चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी केली पाहिजे नाहीतर मिंधे यांनी स्वत: राजीनामा दिले पाहिजे.  बाळासाहेबांचे नाव घेणारे मिंधे आता कुणाला जोडे मारणार की स्वत:च्या तोंडावर जोडा मारून घेणार असा प्रश्न करतानाच सत्तेसाठी तुम्ही काय हवे ते चाटा पण यापुढे बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊ नका असेही त्यांनी शिंदे गटाला ठणकावले. बाळासाहेबांचा इतका अपमान झाला नाही. आता बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच भाजप हा भारतीय जनता पक्ष नव्हे तर भरकटलेला जनता पक्ष असा आहे. या भरकटलेल्या पक्षासोबत किती दिवस बसणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.


 'बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, असेही ठाकरे म्हणाले.  'यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतःच स्वतःला जोडे मारणार आहेत?त्यांच्या कडून येऊ द्या भाजपच्या कार्यालयात सराव सुरु असेल, असा घणाघात देखील ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. यांचे हिंदुत्व नेमके आहे तरी काय?  आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसे भाजपने एकदा त्यांचे हिंदुत्व नेमके काय ते स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.



उद्धव ठाकरेंचे गैरसमज गैरसमज दूर करणार : चंद्रकांत पाटलांचा खुलासा 


बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी करताच चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा तातडीने पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर खुलासा केला. मी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून गैरसमज दूर करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील स्पष्टीकरण देताना म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मला नेहमीच श्रद्धा आहे. त्या मुलाखतीत मी श्रद्धेने हे मांडलेय. बाळासाहेबांमुळे अनेक हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली. मुंबई जेव्हा दंगली व्हायच्या, तेव्हा मुंबईतला हिंदु जीवंत राहिला. माझ्या मनात त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलेत. बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजे अयोध्येत राम जन्मभूमी आहे, हे प्रस्थापित करण्याच आंदोलन ८३ पासून विश्व हिंदु परिषदेच्या नेतृत्वात सुरु झाले. बजरंग दल, दुर्गाबाईंनी केले. दोन वेळा अशा प्रकारची अयोध्येच्या दिशेने कुच झाली. प्रत्यक्ष ढाचा पडताना, सगळे हिंदू होते. हे शिवसेनेचे, ते अन्य असा भेद नव्हता. हे सगळे विश्वहिंदु परिषद, बजरंग दलाच्या बॅनरखाली होते. त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा संबंध होत, तर तसे नाही. आनंद दिघे यांनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी श्रेय घेतलेच होते. चुकूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील दिले