आत्माराम मोरे शालेय कबड्डी: समता, माणेकलालची विजयी सलामी

Santosh Sakpal January 16, 2024 06:36 AM


मुंबई शिवनेर;

    महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून सुरु झालेल्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेत समता विद्यामंदिर-असल्फा, माणेकलाल मेहता मुंबई पब्लिक स्कूल-घाटकोपर पश्चिम संघांनी सलामीचे सामने जिंकले. हर्ष पावसकरच्या दमदार खेळामुळे समता विद्यामंदिरने पूर्वार्धात सुंदर खेळ करणाऱ्या वेद सावंतच्या तुलीप विद्यालयाचे आव्हान ५७-४३ असे संपुष्टात आणले. उद्घाटनीय सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल उद्घाटक सेक्युर वन सेक्युरिटी सर्व्हिसचे ऑपरेशन मॅनेजर अरुण माने, क्रीडा शिक्षक सुनील खोपकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.


     आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पश्चिम उपनगर विभागीय दुसऱ्या सामन्यात कुलदीप सिंग व राहुल बराई यांच्या चौफेर खेळामुळे माणेकलाल मेहता एमपीएस संघाने सरस्वती विद्यामंदिर विरुध्द पहिल्या डावात ३०-१२ अशी आश्वासक आघाडी घेतली. उत्तरार्धात चढाईचा उत्तम सूर सापडलेल्या जय दळवीने आक्रमक खेळ करूनही सरस्वती विद्यामंदिरला पराभवास सामोरे जावे लागले. मध्यंतराच्या मोठ्या आघाडीच्या बळावर माणेकलाल स्कूलने ४१-३० अशी बाजी मारली. ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव व ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरु झालेल्या स्पर्धेमधील संघांना क्रीडा शिक्षक सुनील खोपकर यांनी प्रात्यक्षिकांसह कबड्डी तंत्राचे तर लीलाधर चव्हाण यांनी कबड्डी नियमांविषयी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा विविध ४ विभागांमध्ये १३ फेब्रुवारीपर्यंत रंगणार असून संघटन समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी मोफत प्रशिक्षण उपक्रमासह शालेय खेळाडूंना अल्पोपहार व्यवस्थासुध्दा केली आहे.


******************************