आत्माराम मोरे शालेय कबड्डी: पूर्व विभागातून अफॅक स्कूल प्रथम

Santosh Sakpal January 25, 2024 11:42 AM

मुंबई -शिवनेर     ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेमधील पूर्व मुंबई विभागातून अफॅक स्कूल-चेंबूर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विभागीय स्पर्धेमध्ये अफॅक स्कूलने चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूलचे आव्हान ५०-४५ असे संपुष्टात आणून सुपर लीगमधील स्थान निश्चित केले. दक्षिण मुंबई विभाग स्पर्धेला २ फेब्रुवारीपासून डॉकयार्ड-माझगाव येथे प्रारंभ होणार आहे.  

   पूर्व मंबई विभागाच्या निर्णायक सामन्यात अष्टपैलू विराज जुजार, कृष्णा तेली, विनितेश शावी यांच्या आक्रमक खेळामुळे अफॅक स्कूलने चुनाभट्टी स्कूलविरुध्द पहिल्या डावात ३४-१८ अशी मोठी आघाडी घेतली. उशिरा सूर सापडलेल्या अनिश भुल, ओमकार भावे, बसंत साउद यांच्या उत्तरार्धातील दमदार खेळामुळे चुनाभट्टी स्कूलने बाजी उलटविण्यासाठी शर्थीची झुंज दिली. परंतु मध्यंतराच्या १४ गुणांच्या आघाडीमुळे अफॅक स्कूलने अखेर ५०-४५ असा ५ गुणांनी विजय संपादन केला. याप्रसंगी प्रशिक्षक सुनील खोपकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले.


******************************