आत्माराम मोरे शालेय कबड्डी: दक्षिण मुंबईतून डिसोझा हायस्कूल प्रथम

Santosh Sakpal February 06, 2024 08:39 PM

मुंबई, shivner: ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेमधील दक्षिण मुंबई विभागातून अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. डिसोझा हायस्कूलने करी रोड येथील मुक्तांगण हायस्कूलचा ३८-३१ असा पराभव करून सुपर लीगच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू रचित वागमोडेला सामनावीर पुरस्काराने क्रीडाप्रेमी शांताराम सुखठणकर, ऑगस्टीन फर्नांडीस, प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.

आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित दक्षिण मुंबई विभाग शालेय कबड्डी स्पर्धेमधील निर्णायक सामना डिसोझा हायस्कूल विरुध्द मुक्तांगण हायस्कूल यामध्ये रंगला. रचित वागमोडे व आदित्य शेरकर यांच्या चौफेर खेळामुळे डिसोझा हायस्कूलने मुक्तांगण हायस्कूलचे आव्हान ७ गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले. पराभूत संघाच्या आर्यन फराकटेने छान खेळ केला. मध्य मुंबई विभागाच्या प्राथमिक फेऱ्यांना ५ फेब्रुवारीला डॉकयार्ड रोड येथील बांदल क्रीडांगणात प्रारंभ होत आहे. मोडक हायस्कूल, ज्ञानेश्वर विद्यालय, एस.पी. हायस्कूल, डासिल्व्हा हायस्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर, काणे नगर मुंबई पब्लिक स्कूल यामध्ये मध्य मुंबई विभागाच्या प्रथम क्रमांकासाठी चुरस होण्याची शक्यता आहे.