आत्माराम मोरे स्मृती शालेय कबड्डी स्पर्धेत:_ २० संघांमध्ये आजपासून चुरस

Santosh Sakpal January 14, 2024 02:44 PM


मुंबई:_Shivner

    आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत विभागवार होणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी २० संघांमध्ये चुरस होणार आहे. प्राथमिक पहिल्या विभागाची माणिकलाल मेहता मुंबई पब्लिक स्कूल विरुध्द सरस्वती विद्यामंदिर यामधील उद्घाटनीय लढत सेक्युर वन सेक्युरिटी सर्व्हिसचे ऑपरेशन मॅनेजर अरुण माने, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ९.०० वा. घाटकोपर-पश्चिम येथे होईल.


     मुंबईतील विविध चार विभागामध्ये समता विद्यामंदिर-असल्फा, तुलीप विद्यामंदिर-घाटकोपर, अॅन्टोनिओ डिसोझा हायस्कूल-भायखळा, रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड, सर एली कादुरी हायस्कूल-माझगाव, सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरी, ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, मुक्तांगण स्कूल-करी रोड, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा, सेस मायकल हायस्कूल-कुर्ला, अफॅक हायस्कूल-चेंबूर, सरस्वती एज्युकेशन-चेंबूर, चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूल, कुमुद विद्यामंदिर-गोवंडी, मुक्तानंद हायस्कूल-चेंबूर, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी आदी संघांचा समावेश आहे. विभाग विजेते शालेय संघ ८ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अंतिम टप्प्यातील चँम्पियन ऑफ चँम्पियन्स सुपर लीगसाठी पात्र ठरणार आहेत.


    संपूर्ण स्पर्धेमधून उत्कृष्ट शालेय ४० खेळाडूंचे ४ संघ तयार करून मुंबईत विविध ठिकाणी त्यांचे कबड्डी कसोटी सामने वार्षिक परीक्षेनंतर एप्रिलमध्ये मोफत प्रशिक्षणासह खेळविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली. प्राथमिक फेरीच्या प्रत्येक सामन्यानंतर शालेय खेळाडूंना अनुभवी क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, सुनील खोपकर, प्रॉमिस सैतवडेकर आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.


******************************