आत्माराम मोरे शालेय कबड्डी: अफॅक, चुनाभट्टी एमपीएस विजयी

Santosh Sakpal January 23, 2024 11:28 PM

SHIVNER/MUMBAI

महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून सुरु झालेल्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेमधील द्वितीय विभागातून अफॅक स्कूल-चेंबूर, चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूल संघांनी विजयीदौड केली. आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्पर्धेमधील शालेय खेळाडूंना कबड्डी खेळाचे व नियमांचे देखील मार्गदर्शन लाभत आहे.

अफॅक स्कूल विरुध्द गांधी बालमंदिर यामधील सामना दोन्ही डावात झटापटीच्या खेळाने रंगला. अष्टपैलू विराज जुजारच्या चौफेर चढायांमुळे अखेर अफॅक स्कूलने गांधी बालमंदिरचा ३६-३४ असा निसटता पराभव करून विजय संपादन केला. पराभूत संघाच्या गोपाळ जाधवने सुंदर खेळ केला. दुसऱ्या सामन्यात चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूलने समता शाळेवर ३२-३० असा विजय मिळविताना अनिश भूल चमकला. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना पुरस्कार देऊन सेक्युर वन सेक्युरिटी सर्व्हिसचे मुख्य अधिकारी मंगेश राणे, प्रशिक्षक सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.