सावरकरांच्या नावावरून राजकारण तापणार ! सावरकर गौरव यात्रेची मुख्यमंत्रयाकडून घोषणा

Santosh Gaikwad March 27, 2023 05:06 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या  निषेधार्थ काँग्रेसकडून देशभरात सत्याग्रह आंदोलन सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. वीर सावरकरांचा अपमान करणा-या राहुल गांधीचा तीव्र शब्दात निषेध करीत असून, राज्यात सावरकर गौरव यात्रेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. हे केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून दाखवणार का ? असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी करीत नाव न घेता उध्दव ठाकरेंना केला. त्यामुळे सावकरांच्या नावावरून राज्यात राजकारण तापणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा सातत्याने अपमान केला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातो आहे.

  ज्या सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्याचा उपभोग सगळे घेतोय. त्यामुळेच या देशात लोकशाही आहे. मात्र त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा निषेध राज्यच नव्हे तर देशभरात केला जातोय. एक दिवस सावरकर जिथे अंदमानाच्या जेलमध्ये राहत होते, तिथे राहुल गांधींनी राहून यावं. ज्यांनी त्यांचा अवमान केला, ते वारंवार सांगतायत, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकरांचा त्याग तुमच्यात नाही. सावरकर व्हायला देशाबद्दल प्रेम पाहिजे. तुम्ही तर परदेशात जाऊन देशाची निंदा करता. यापेक्षा देशाचं दुर्दैवं काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय.

वीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर यांनी केला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. काल सभेत वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याला थोबाडित मारणार का ? सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? ते तरी सांगा असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान निमुटपणे सहन करणा-यांच्या  जाेडे हाणले असते असेही मुख्यमंत्री म्हणाले.  राज्यात सावरकर प्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे  जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरा शहरांमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा सुरू करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.