गारपीट,अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा : अंबादास दानवेंची सरकारकडे मागणी

Santosh Gaikwad December 08, 2023 07:11 PM

नागपूर - राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज २८९ अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्याद्वारे केली. 

   राज्यातील संभाजीनगर, जळगाव, पालघर, नागपूर, हिंगोली, नांदेड व नाशिक सह अनेक जिल्ह्यात मोठया प्रमाणात गारपीट व अवकाळीने थैमान घातले आहे. यामुळे द्राक्ष,कलिंगड, संत्री,मोसंबी, टोमॅटो व कापसाची बोंड भिजली आहेत. सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, ती नेमकी कोणत्या नुकसानीसाठी केली याबाबत भूमिका स्पष्ट करावी, शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील दानवे यांनी आज सभागृहात लावून धरली.

उत्तर महाराष्ट्रात केळी व विदर्भात कापसाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असताना सरकारने त्यासाठी कोणतीही मदत जाहीर केली नसल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

    तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढीसाठी केलेल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करावा अशी सूचनाही दानवे यांनी सरकारला केली.