आदिवासी आदिम जमातीच्या लोकांना घरे, रोजगार, शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Santosh Gaikwad July 20, 2023 09:49 PM


 मुंबई, दि. 20 : आदिवासी समाजामध्ये आदिम जमातींचे मागासलेपण अधिक आहे. त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची जमीन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल, अथवा विशेष योजना करून जमीन खरेदी करून त्यावर घर तयार करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.


  फलटण तालुक्यातील सोनावडे येथे कोळसा भट्टीवर काम करणाऱ्या महिला मजूरावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आदिम जमातीकरिता सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.


  उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, ही घटना गंभीर आहे. या घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील एक आरोपी बाळू शेख यास अटक करण्यात आली आहे. इतर चार अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. ही महिला आपल्या गावी परत गेल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पुढे येऊन हा गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदार फलटण यांच्याकडून गरीब कातकरी तीन कुटुंबातील 11 व्यक्तींना बंधमुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. या प्रकरणी महिलेच्या वैद्यकीय अहवालात जाणीवपूर्वक दिरंगाई झाली आहे का ते तपासून तसे असल्यास संबंधितांवर कारवाई करू असे त्यांनी सांगितले. अशा प्रकरणी वैद्यकीय चाचणी वेळेत होईल याची दक्षता घेतली जाईल, असेही ते म्हणाले.


            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अशा घटना अंधारात घडतात, त्यामुळे आरोपी ओळखले जात नाही, यामुळे आरोपी सुटतात. यासाठी एफआयआर नोंदविताना परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार होऊन एफआयआर नोंदणीच्या पद्धतीत बदल करण्याची तसेच वीटभट्टी आणि निवासी कामगारांची कामगार विभागाकडे नोंद असावी, अशी सूचना केली. यावर बोलताना एफआयआर नोंदणीच्या पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत प्रशिक्षण देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे उपमुख्यमंत्री  .फडणवीस यांनी सांगितले.  या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, राम शिंदे, श्रीमती डॉ.मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.