तुम्ही ५ वर्षाचा हिशोब द्या, मी १० वर्षाचा देतो : अमित शाह यांची शरद पवारांना टीका

Santosh Gaikwad March 05, 2024 06:39 PM



जळगावमहाराष्ट्राची जनता शरद पवार यांना ५० वर्षांपासून सहन करते आहे. शरद पवार यांनी मागील ५० वर्ष सोडा जनतेला ५ वर्षाचा हिशोब द्यावा, मी १० वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. तसेच शाह यांनी यावेळी  महाविकास आघाडीला तीन चाकांची रिक्षा संबोंधलं. ही रिक्षा पंक्चर झालेली असून महाराष्ट्राचा विकास करणार नाही, असं वक्तव्य शाह यांनी यावेळी केलं.

अमित शहा हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जळगाव शहरातील सागर पार्कवर 25 हजार युवकांसोबत संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शदरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

अमित शहा म्हणाले  की, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक होत आहे. विकसित भारत बनण्यासाठी निवडणूक होत आहे. आगामी निवडणूक २०४७ च्या विकसित भारतासाठी आहे. भाजपा आणि मोदींची नाही तर युवकांची निवडणूक आहे. पुढच्यावेळी व्यासपीठावर वेगळे नेते असतील पण युवकांचा विकास झालेला असेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर

इंडिया आघाडीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, मोदींविरोधात तयार झालेली आघाडी कमजोर आहे. घराणेशाही पुढे नेणारा पक्ष देशाचा विकास करू शकत नाही. महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर आहेत. ते फक्त त्यांच्या मुला मुलींना सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला.