आंबेकर स्मृती शालेय कॅरम: युनिव्हर्सल, पार्ले टिळक उपांत्य फेरीत

Santosh Sakpal December 10, 2023 06:39 PM

MUMBAI :    कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक विनाशुल्क आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसर, पार्ले टिळक विद्यालय आदी संघांनी उपांत्य फेरी गाठली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर शालेय कॅरम स्पर्धेमधील साखळी ब गटाचा प्रथम क्रमांक पटकाविण्यासाठी युनिव्हर्सल हायस्कूलला साकीनाक्याच्या  समता विद्यामंदिरने २-१ असे झुंजविले. विलेपार्लेच्या पार्ले टिळक विद्यालयाने साखळी अ गटामध्ये अग्रस्थानी झेप घेतांना कुर्ल्याच्या सेस मायकल हायस्कूलचा ३-० असा पराभव केला.


    रुद्र सोळंकीने समता विद्यामंदिरच्या अनमोल चौहानचा २१-४ असा पराभव करून युनिव्हर्सल हायस्कूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीत लोकेश पुजारीने हर्ष सोळंकीवर १९-१४ असा विजय मिळवीत समता विद्यामंदिरला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्णायक एकेरी सामन्यात सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत वेदांत राणेने समता विद्यामंदिरच्या करण गायकवाडला २४-० असे नमविले आणि युनिव्हर्सल हायस्कूलच्या विजयावर २-१ असा शिक्कामोर्तब केला.


    दुसऱ्या सामन्यात पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरने निखील भोसलेचा १३-० असा, मंदार पालकरने शुभम परमारचा ९-५ असा व अमेय जंगमने गंधर्व नारायणकरचा ९-६ असा पराभव करून सेस मायकल हायस्कूलवर ३-० असा सहज विजय संपादन केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते सहकार्यीत स्पर्धेमधील शालेय खेळाडूंना सुवर्णपदक पटकाविलेल्या भारतीय कॅरम संघाचे तत्कालीन प्रशिक्षक व राष्ट्रीय कॅरमपटू सुहास कांबळी, नामवंत कॅरमपटू प्रमोद शेवाळे, विख्यात कॅरम पंच प्रणेश पवार, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पंचाची कामगिरी प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, ओमकार चव्हाण, वेदांत महाडिक आदी मंडळी करीत आहेत.