आंबेकर स्मृती कॅरम: मायकल, नारायण गुरु हायस्कूल विजयी

Santosh Sakpal December 08, 2023 06:26 PM

MUMBAI , SHIVNER

कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक विनाशुल्क आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेतील पूर्व मुंबई विभाग प्राथमिक फेरीत कुर्ल्याच्या मायकल हायस्कूल-मुली, चेंबूरच्या नारायण गुरु हायस्कूल आदी संघांनी पहिला साखळी विजय मिळविला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित चेंबूर येथील विभागीय शालेय स्पर्धेमध्ये मायकल हायस्कूल मुलींच्या संघाने कुमुद विद्या मंदिरला २-१ असे तर नारायण गुरु हायस्कूलने मुलांच्या मायकल हायस्कूलला २-१ असे चकविले.

सिध्दार्थ सावंतने फातिमा खानचा १९-० असा पराभव करून मायकल हायस्कूल विरुद्ध कुमुद विद्या मंदिरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु दुसऱ्या एकेरीत असमिया शेखने प्रज्वल शिवगणचा १५-१४ असा चुरशीचा पराभव करून मायकल हायस्कूलला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्णायक एकेरीच्या सामन्यात नौशीन शाहने मयांक पवारचे आव्हान १०-४ असे संपुष्टात आणून मायकल हायस्कूल-मुली संघाच्या विजयावर २-१ असा शिक्कामोर्तब केला.

दुसऱ्या सामन्यात उमर पठाणने शुभम परमारवर १२-० असा तर शाहीद खानने गंधर्व नारायणकरवर ८-२ असा विजय मिळविल्यामुळे नारायण गुरु हायस्कूलने मुलांच्या मायकल हायस्कूलला २-१ असे नमविले. मायकल स्कूलच्या निखील भोसलेने गणपत परीहारीयाचा २५-० असा पराभव केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते सहकार्यीत पूर्व मुंबई विभाग आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेला नारायण गुरु हायस्कूलच्या स्पोर्ट्स डायरेक्टर पूनम मुजावर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रीती वायाळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.