अमर हिंद मंडळाची वसंत व्याख्यानमाला आजपासून

SANTOSH SAKPAL April 22, 2023 11:26 PM


  मुंबई :  अमर हिंद मंडळाची ७६ वी वसंत व्याख्यानमाला २३ ते २९ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ७.०० वा. अमर हिंद मंडळाचे पटांगण, अमरवाडी, दादर-पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. मनोज भाटवडेकर यांच्या ‘सांगा, कसं जगायचं?’ यावरील व्याख्यानाने रविवारी होणार आहे. काळानुरूप समाजप्रबोधनाचे अत्यावश्यक विषय आणि त्या अनुषंगाने निष्णांत वक्ते, अशा दुग्धशर्करा योगामुळे गेली ७५ वर्षांची परंपरा लाभलेल्या अमर हिंद मंडळाची व्याख्यानमाला श्रोते वर्गाच्या अपूर्व प्रतिसादामुळे वसंत ऋतूत प्रतिवर्षी फुलत असते.

    वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प २४ एप्रिल रोजी ट्रंक कॉल दि वाईल्डलाईफ फौंडेशनचे अध्यक्ष व हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांच्या ‘संवाद हत्तीशी’ व्याख्यानाने; तिसरे पुष्प २५ एप्रिल रोजी सिडॅकच्या वरिष्ठ संचालक डॉ. पद्मजा जोशी यांच्या ‘सायबर जग आणि आपण’ व्याख्यानाने; चौथे पुष्प २६ एप्रिल रोजी दशमी क्रिएशनचे निर्माते नितीन वैद्य यांच्या ‘मनोरंजनाची बदलती दुनिया’ व्याख्यानाने; पाचवे पुष्प २७ एप्रिल रोजी पटकथाकार अरविंद जगताप यांच्या ‘गोष्ट छोटी डोंगाराएवढी’ व्याख्यानाने; सहावे पुष्प २८ एप्रिल रोजी पद्मश्री दादा इदाते यांच्या ‘सामाजिक समरसता’ व्याख्यानाने तर सातवे पुष्प २९ एप्रिल रोजी गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या ‘गान गुणगान’ विषयावरील व्याख्यानाने गुंफले जाणार आहे.