गणेशभक्तांच्या भावनांचा आदर राखा, आरे तलावात गणेश विसर्जनास परवानगी द्या - आमदार रविंद्र वायकर

Santosh Gaikwad August 19, 2023 05:19 PM


मुंबई, ता. 19: आरे परिसरातील गोरेगाव, दिडोंशी, मालाड, पवई, अधेरी पूर्वेकडील भागातील गणेश मुर्तींचे आरे तलावात दरवर्षी विसर्जन केले जाते. यंदा आरे प्रशासनाने मूर्ती विसर्जनास विरोध केल्याने आमदार रविंद्र वायकर यांनी पशू व दुग्ध विभागाच्या मंत्री आणि सचिवांना पत्र लिहून, आरे तलावातील गणेशमूर्ती विसर्जनाची प्रथा आणि परंपरा मोडीत काढू नये. गणेश भक्तांच्या भावनांचा आदर करून मूर्ती विसर्जनास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 


पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आरेचा संपुर्ण परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून ५ डिसेंबर २०१६ पासून केंद्र सरकारने घोषित केला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून आरेमधील तलावात गणेशमुर्ती विसर्जनाची परवानगी आरे प्रशासनाने नाकारली आहे. तसे परिपत्रक मनपाच्या पी दक्षिण विभागाला दिले आहे. आरे प्रशासनाने गणेशमुर्ती विसर्जनास बंदी घातल्याने गणेश भक्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रशासनाने कितीही विरोध केला तरी इतक्या वर्षांची प्रथा व परंपरा मोडीत न काढता आरे तलावातच गणेशमुर्तींचे विसर्जन करणार, अशी भूमिका गणेश भक्तांनी घेतली आहे. विसर्जनावरून गालबोट लागू नये, यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी आमदार रविंद्र वायकर यांच्या केली आहे.


आमदार वायकर यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत, पशु व दुग्ध विकास विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सचिव तुकाराम मुंडे, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाकचौरे, आरे पोलिस ठाणे यांना पत्र लिहीले आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानंतर ही तलावात दरवर्षी गोरेगाव, दिंडोशी, मालाड, पवई, अंधेरी (पूर्व) तसेच आरे परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होते. गेल्या अनेक वर्षांची प्रथा व परंपरा आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या भावनांचा अनादर न करता, कित्येक वर्षांची प्रथा व परंपरा मोडीत काढू नका. आरे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि आरे तलावात गणेशमुर्ती विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.