पुणे : आदिवासी शाळांमध्ये ८० कोटी रुपयांचा आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये २५० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळे या खात्यातील ‘डोके’ भणाणून सोडणारा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे.
शासकीय वसतीगृहामधील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट देताना प्रतिवर्षी ३५० कोटी याप्रमाणे तीन वर्षांत १ हजार ५० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामध्ये २५० कोटींचा घोटाळा ‘डोके’ वापरून केला गेला आहे. कंत्राट मिळालेल्या कंपन्यांनी संबंधितांना घसघशीत मलिदा दिला आहे.
या खात्याशी संबंधित असलेले एक उच्चपदस्थ अधिकारी अत्यंत वादग्रस्त असून यापूर्वी त्यांना अॅण्टी करप्शन ब्यूरोने रंगेहात पकडले होते. पण ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ या उक्तीप्रमाणे सदर अधिकारी आजही करोडो रुपयांच्या घोटाळ्यात अखंडपणे गुंतला आहे. अगदी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासारख्या छोट्या-मोठ्या कामाचेही पैसे वसूल करणारा हा दानव पैसे खाण्याच्या बाबतीत बकासूर आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. रोज पुण्यात १०० कि.मी.च्या परिघात फिरून स्वत: जातीने वसुली करणार्या या अधिकार्याचे धाडस भल्या भल्या भ्रष्टाचार्यांना लाजवणारे आहे. सदर अधिकार्याच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे आमच्याकडे आले असून त्यांची छाननी झाल्यानंतर या अधिकार्याची संपूर्ण कुंडली येथे मांडण्यात येईल. तूर्त एवढेच !