अजित पवारांचा राष्ट्रवादीवरच दावा, पक्ष चिन्हासह सत्तेत सहभागी झालेाय !

Santosh Gaikwad July 02, 2023 06:00 PM


मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. विकासाला प्राधान्य देत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहेत. यापुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहोत असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 


प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ''आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये जायचा निर्णय घेतला. हा निर्णय वरिष्ठांची चर्चा करुनच घेतला. त्या प्रकारे मी आणि सहकाऱ्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे. इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहील. राज्यमंत्रीपद, मंत्रिपदे दिली जातील. 


अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात केंद्रीय निधी जास्तीत जास्त कसा मिळवता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा निर्णय घेताना आमदार आणि लोकप्रतीनीधींना देखील हा निर्णय मान्य आहे. विकास कोणत्या मार्गाने करता येईल याकडे आमचं लक्ष्य आहे. कोण टीका करतं याचा आम्हाला फरक पडत नाही. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही जाऊ शकतो. पुढच्या निवडणुका मोदींसोबत लढणार असे पवार यांनी सांगितले

 

यावेळी बोलताना नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सरकारमधील तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. पक्ष सोडला नाही. ज्या चर्चा सुरू होती. त्या बद्दल बोलत नाही. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर कुठे तरी सकारात्मक काम करणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास आहे. अतिशय मजबुतीने देशाचे नेतृत्व त्यांच्या हाती सुखरूप आहे. असे भुजबळ म्हणाले.