लाठीमाराचे आदेश दिल्याचे सिध्द करा, राजकारण सोडू : अजित पवार

Santosh Gaikwad September 04, 2023 06:09 PM


मुंबई :  मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश 'वरून' देण्यात आले, असा आरोप विरोधक वारंवार करत आहेत. विरोधकांनी हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. जर आरोप सिध्द झाले नाही तर विरोधकांनी राजकारण सोडावे असेही ते म्हणाले.  मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 


अजित पवार म्हणाले की,  लाठीचार्ज व्हायला नको होता. सरकारने याबद्दल क्षमा मागितली आहे. काही घटक समाजात अस्वस्थता कशी राहिल याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केलं.  जेव्हा राज्यात अशा घटना घडतात तेव्हा याचे राजकारण केले जाते हे दुदैवी आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजात गैरसमज पसरवले जात आहेत काही जणांकडून मंत्रालयातून लाठीमाराचे आदेश आले असल्याचा आरोप केला जातोय त्यांनी हे सिध्द करून दाखवावे असेही पवार म्हणाले. 


मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर पहिल्यापासूनच आग्रही आहेत मराठा आरक्षण टिकवण्यासाठी स्वत: फडणवीसांचे प्रयत्न आहेत सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर आहे आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले.