अजित पवार, एकनाथ शिंदे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील : रोहित पवारांचे भाकीत

Santosh Gaikwad September 22, 2023 06:12 PM


मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केला जात आहे. दुसरीकडे मावळबद्दल बोलून अजित पवारांना अडचणीत आणलं जात आहे. दोन्ही लोकनेत्यांचे अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवले जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवलं जाणार आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असे भाकीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यातील राजकारणात मागील काही वर्षांपासून चांगल्याच उलाढाली होताना दिसत आहेत. याच दरम्यान आधी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर 2 जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीतही मोठे बंड झाले. आता सत्तेत तीन पक्ष असून, सत्ताधाऱ्यांवर विरोधक या ना त्या कारणाने हल्ला चढवत आहेत. यादरम्यान मागील काही महिन्यांपासून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकाणात चर्चेला उधाण आले आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, 2019 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याचे तिकीट कोणी कापले हे त्यांनीही सांगावे. आज चंद्रशेखर बावनकुळे पडळकरांची बाजू घेत आहेत. पण त्यांची परिस्थिती काय झाली आणि कोणी केली याचा विचार व्हावा, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. निधीसाठी आमदारांकडून प्रतिज्ञापत्रांवर सह्या करून घेतल्या जात आहेत. त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमदारांची कामं करून देताना त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. विकासकामांसाठी निधी हवा आहे का? प्रतिज्ञापत्र दे असे सांगितले जाते. सोप्या भाषेत याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, असे रोहित यांनी सांगितलं.
 

यावेळी भाजपवर टीका करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, भाजपला कोणताही लोकनेता अडवत नाहीत. पंकजा मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आणि आता नितीन गडकरी यांच्या बद्दल हेच झाले. मोहिते-पिचड यांच्या सारखे एकनाथ शिंदे यांचे होणार. आणि अजित पवारांचेही तेच होणार असल्याचेही आमदार रोहित पवार म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही तेच होणार आहे. शिंदेना विधानसभा अध्यक्ष अपात्र ठरवणार नाहीत. पण कोर्टात जाणार आणि ते अपात्र होतील, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.