“देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू”, असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चुकांचा पाढा वाचत अजित पवारांनी खरडपट्टी काढली

Santosh sakpal May 02, 2023 08:28 AM

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकांचा पाढा वाचत जोरदार खरडपट्टी काढली. मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू म्हणतात असं सांगत त्यांनी एकनाथ शिंदेंना द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याशिवायही शिंदेंकडून झालेल्या चुकांची यादीच अजित पवारांनी वाचली. ते सोमवारी (१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित वज्रमुठ सभेत बोलत होते.


अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने या शिंदे-फडणवीस सरकारला नपूंसक म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने देशातील इतर कोणत्या राज्य सरकारला नपुंसक म्हटलं. याचीही यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. राज्यात प्रक्षोभक भाषणं होत असताना, दंगली माजवण्याचा प्रयत्न होत असताना ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही ते नपुंसक सरकार आहे अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा महाराष्ट्राचा कमीपणा नाही का?”


व्हिडीओ पाहा : 

https://youtu.be/WjdLtzhwPo0


“आता कशाला साडेतीनशे पन्नास म्हणतात कुणाला माहिती”

अजित पवार उद्धव ठाकरेंच्या लक्षात आणून देत म्हणाले, “काल की परवाच काही उद्योगपतींसमोर भाषण सुरू होतं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही मुंबईत साडेतीनशे पन्नास किमी मेट्रोलाईन टाकली. आता कशाला साडेतीनशे पन्नास म्हणतात कुणाला माहिती. ते राज्याच्या १३-१४ कोटी जनतेचे प्रमुख आहेत. जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी नोट काढावी आणि ती नोट वाचावी. काही बिघडत नाही. मात्र, साडेतीनशे पन्नास कोटी कशाला म्हणतात. गणिताचे विद्यार्थी तर तोंडात बोटच घालतील.”

“त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे”

“मागे एमपीएससी आणि निवडणूक आयोगातही घोटाळा करून टाकला होता. ते घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

“मिंधेंनी गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला…”

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनीही शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “१ मेच्या मध्यरात्री मी हुतात्मा चौकात गेलो होतो. आम्ही पोहचलो तोपर्यंत कुणीही तिथे पोहचलेला नव्हता. आज सकाळी गेले असतील मिंधे. क्रियाकर्म म्हणून करायचं म्हणून जायचं आणि मानवंदना देऊन यायचं. गेलेच असतील जाणार कुठे? मात्र मिंध्यांना मला एक सांगायचं आहे की या लोकांनी लढा दिला नसता तर गद्दारी करून का होईना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता. तसंच गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला करु नका, महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका.”

खुर्चीचा उपयोग मिंध्यांनी फक्त बुड टेकवायला करु नये

“मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षस खुर्चीवर बसला होता. त्याने गोळीबाराचे आदेश दिले होते. तेव्हा अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते. हे तुम्हाला सांगायला पाहिजे कारण मुंबई कशी मिळाली तुम्हाला समजलं पाहिजे. इमारतींमध्ये अश्रूधुरांचा मारा केला होता. अनेक महिलांचे, लोकांचे हाल झाले. आपला मराठी माणूस, मराठी रणरागिणी कुणीही शरण गेलं नाही. उलट पोलिसांना सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला, पण मुंबई आम्ही हातातून जाऊ देणार नाही. मला मिंध्यांना सांगायचं आहे की महिलांमध्ये जी जिद्द होती ती कणभर तरी तुमच्यामध्ये घ्या. खुर्ची मिळाली आहे बुड टेकायला म्हणून वापरत बसू नका महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.