बदनामीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधींची लोकसभेला भेट

Narendra Wable March 24, 2023 12:00 AM

बदनामीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर 

राहुल गांधींची लोकसभेला भेट


नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना काल बदनामी खटल्यात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व धोक्यात आले असताना त्यांनी आज थोड्या वेळासाठी लोकसभेत प्रवेश केला. घोषणांच्या गदारोळात दुपारपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आल्यानंतर ते बाहेर पडले.


केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या राहुल गांधी यांना त्यांच्या ‘मोदी’ या आडनावावरील कथित भाष्यासाठी दोषी ठरविण्यात येऊन त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. गुजरात न्यायालयाने त्यांना वरच्या कोर्टात अपील करण्याकरिता ३० दिवसांचा जामीन मंजूर केला. 


लोकसभा सदस्याला एखाद्या गुन्ह्यात किमान दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यास लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८(३) द्वारे त्याला बडतर्फ करता येते. तज्ज्ञांच्या मते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व आपोआपच रद्द होते. तर काही तज्ज्ञांच्या मते त्यांनी या निकालाविरुद्ध अपील करून विजय मिळविल्यास त्यांचे सदस्यत्व अबाधित राहते.

तज्ज्ञांच्या मते सुरत कोर्टाच्या निकालाच्या आधारे लोकसभा सचिवालय राहुल गांधी यांना अपात्र ठरवू शकते. पण या सचिवालयाने अद्याप तशी कोणतीही घोषणा केलेली नाही.


सुप्रसिद्ध वकील डॉ. निलेश पावसकर यांनी ‘शिवनेर’ला सांगितले की, या कायद्यानुसार श्री. गांधी यांना अपात्र ठरविता येऊ शकते. पण हा निर्णय लोकसभा अध्यक्षांना कळविणे आवश्यक आहे. 


माजी कायदा मंत्री श्री. कपिल सिब्बल म्हणतात की, श्री. गांधी हे खासदार म्हणून आपोआप अपात्र ठरतात. त्यांचे लोकसभा सदस्यत्व अबाधित ठेवायचे असल्यास केवळ शिक्षा तहकूब करणे पुरेसे नाही. तर त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणणे आवश्यक आहे.


श्री. राहुल गांधी यांनी वरील न्यायालयात अपील केल्यानंतर त्यांची शिक्षा रद्द न झाल्यास पुढील आठ वर्षे त्यांना निवडणूक लढता येणार नाही. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरत न्यायालयाच्या निकालाविरुद्ध श्री. गांधी हे सत्र न्यायालयात अपील करणार आहेत. या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास ते सर्वोच्च न्यायालयात जातील.


कर्नाटकच्या कोलार येथील एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना श्री. राहुल गांधी म्हणाले होते की, ‘सर्व चोरांचे मोदी हे कॉमन आडनाव कसे असते?’ त्यांच्या या विधानावर गुजरातच्या एका माजी मंत्र्याने त्यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. श्री. गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी जमातीला बदनाम केले असल्याचा या मंत्र्याचा दावा होता.


सुरत येथील न्यायालयाने श्री. गांधी यांना या खटल्यात दोषी ठरवित त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. तसेच या खटल्याविरुद्ध अपील करण्याकरिता ३० दिवसांचा जामीन मंजूर केला.


या निकालानंतर ट्विट करताना श्री. गांधी यांनी म्हटले आहे की, ‘माझा धर्म हा सत्य आणि अहिंसेवर आधारीत आहे. सत्य हा माझा परमेश्वर आहे, अहिंसा हे त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे.’