खातेवाटपावर आदित्य ठाकरे यांची बोचरी टीका

Santosh Gaikwad July 15, 2023 06:02 PM


मुंबई : अजित पवार गट शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर खातेवाटपात अजित पवारांना अर्थखातं आणि इतर महत्वाची खाती मिळाली आहेत. नव्या मंत्रयांच्या खातेवाटपावर आणि खांदेपालट यावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्यावर आणि त्यांच्या गटातील आमदारांवर बोचरी टीका करीत अभिनंदन केले आहे. 


राज्यात शिवसेना भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेना भाजपा सरकारला अजित पवार यांची साथ मिळाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थानही मिळालं आहे.  खातेवाटपात महत्त्वाची खातंही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शिंदे गटावर टीका केलीय.     


काय म्हणाले आदित्य ठाकरे


“चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खाते वाटप झालं…पहिले 20, नंतर 9 असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने 33 देशांना दाखवून दिलंय ! अभिनंदन!”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.