आम्ही सगळे एक आहोत या आठवणीसाठी महात्मा फुले, महर्षि शिंदे यांचे विचार महत्त्वाचे : सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

Santosh Gaikwad September 25, 2023 07:40 PM


सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापनदिन व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या  १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित सत्यशोधक समाजाचे एक दिवसीय अधिवेशन संपन्न


मुंबई : आज समाजा-समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. निरनिराळ्या समाजामध्ये जर समाज वाटला गेला तर या देशाचं कसं होणार ? देश स्वतंत्र झाला. आम्हाला घटना मिळाली. आम्ही सगळे एक आहोत. जात, धर्म यांच्या पलिकडे आहोत, हे घटनेने आम्हाला सांगितलं. पण आता आम्ही ते विसरायला लागलो की काय असं वाटायला लागलं आणि म्हणून हे विसरू नये, त्याची आठवण आपण ठेवावी यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापनदिन व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एक दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून बोलताना केला.


सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापनदिन व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘दै. शिवनेर’ व ‘श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे विचार मंचावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाशबापू शेंडगे, ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, प्रा. एस. व्ही. जाधव, अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, रमेश देशमुख आणि ह.भ.प. शामसुंदर सोन्नर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या ५० वर्षांमध्ये राज्यघटनेने क्रांती घडवली आणि सगळ्या समाजांना एकत्रीत करण्याचा प्रयत्न केला, राज्य घटनेने एकत्रीत बांधून ठेवलं, ते आता विखरले जातं की काय, अशी शंका यायला लागली आहे. आताच्या कठीण काळात जेव्हा समाज वेगळी भूमिका घेऊन निघण्याच्या प्रयत्नात दिसत आहे तेव्हा बहुजन समाज अजून हललेला नाही. तो कुठे जाण्याच्या तयारीत नाही. पण तरूण पिढीने आपल्या हातात कार्य घेऊन हे होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.


महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य हे अभूतपूर्व आहे. ते इंग्लंडहून शिकून आले. त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा दलित, वंचित समाजासाठी केला. त्यांच्यावर खूप मोठी टीका टिप्पणी झाली. पण त्यांनी त्यांची पर्वा केली नाही. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्व धर्म समभावाचे बीज रोवले, तर पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाचे बीज रोवले. सर्व धर्म समभावाचे बीज रोवलेले आहे. ते उपटून काढण्याचे काम काही वर्ग करतोय. त्या काळातही असा वर्ग होता. परंतु बहुसंख्य अशा प्रकारचा वर्ग आहे त्याला ही सर्व समाजाची क्रांती आवडत आलेली आहे. आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन समाजउन्नती केली पाहिजे या मताचा नवा शिपाई आहे, असे शिंदे म्हणाले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरात स्त्री शिक्षणाची संस्था उभी केली आणि सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात  स्त्रियांना शिक्षण देण्याचे काम केले. आज जरी सत्तेवर असलेले लोक डांगोरे पिटत असले तरी याचा पाया महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी रोवला आहे. त्या क्रांतीकारकांना आम्हाला विसरून चालणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

 *महिला आरक्षण काँग्रेसच्या काळात* 

महिला आरक्षणाचा प्रश्न काँग्रेसच्या काळात मांडलेला होता. डॉ मनमोहन सिंग यांनी शेवटचे बील राज्यसभेत मांडलं. ते लोकसभेत येणार होतं पण ते येऊ शकले नाही. आताच्या सरकारने ते बील आणलं म्हणून त्यांची वाहवा होते. पण त्याचा पाया कोणी घातला आणि त्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी जी शक्ती निर्माण केली ते सगळं काँग्रेस सरकार आणि समाजवादी विचाराचं सरकार होतं, असेही शिंदे म्हणाले.


वाबळे पिता-पुत्रांचा शिंदेंकडून गौरव

‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मी त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला येतोच, कारण शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे यांच्यापासून ही पुरोगामी विचारांची परंपरा सुरू आहे. कोणी टीका करो अथवा चांगलं म्हणो, ते  चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक करीत असत. समाजाला प्रेरणा देण्याचे काम या पिता-पुत्रांनी केल्याचे गौरवोद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.


माजी आमदार प्रकाशबापू शेंडगे म्हणाले की, आजही समाज कर्मकांडातून बाहेर आलेला नाही. गरीब शेतकरी जमिनदाराच्या जोखाडातून बाहेर आलेला नाही. त्यामुळे सत्यशोधक चळवळ पुन्हा उभी करण्याची आवश्यकता असून, याचा विचार करण्याची गरज आहे. मंदिरांवर कोणाचा ताबा होता आणि आता कोणाचा आहे. संविधान धोक्यात आलं आहे. त्यामुळे जागं झाले पाहिजे. तरूण पिढीला ही चळवळ समजून सांगण्याची वेळ आली आहे असे शेंडगे म्हणाले.


माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले की, दीडशे वर्षापूर्वी ज्या काळात कम्युनिकेशन नव्हतं, शिक्षण नव्हतं त्या काळात महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे विचार कसे मांडले असा प्रश्न पडतो. आजही त्या विचारांची आपल्याला गरज आहे. त्यांचे विचार डॉ. बाबासाहेबांनी संविधानात उतरवले. आज संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळी आरक्षण काढली जात आहेत. कारण हुकुमशाही प्रस्थापित होते आहे. मंडल आयोगाची चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. जस्टीस रोहिणी आयोगाची चर्चा नाही. सगळ्या समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. त्याबद्दल माहितीसुध्दा नाही. हा आयोग लागू झाला तर अनेकांना न्याय मिळू शकतो, असेही राठोड यांनी सांगितले.


आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, बहुजनवादी विचार हा छत्रपतींनतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुनर्जिवीत केला. महात्मा फुलेंच्या मृत्युनंतर खूपच मोठी गॅप पडली. त्यानंतर शाहू महाराजांनी हा विचार पुढे नेला. सत्यशोधक समाजाची परिषद ही व्यापक व्हायला हवी. सत्यशोधक समाजाची पुनर्बांधणी केली पाहिजे. तरूणांकडे त्याचे नेतृत्व दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. खरा इतिहास पुसण्याचे काम आज सुरू आहे. ज्योतिराव फुलेंचा विचार पुढे वाढवायचा कसा यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.

 

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या मुख्य सभागृहाला ‘पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव नगरी’ असे नाव देण्यात आले होते. सभागृहातील विचार मंचाला ‘शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे विचार मंच’ असे नाव देण्यात आले. मुख्य प्रवेशद्वाराला शंकरराव चव्हाण यांचे नाव दिले होते, तर ग्रंथदालनाला सत्यशोधक लेखक रा. ना. चव्हाण आणि भोजन कक्षाला सत्यशोधक शिक्षण महर्षि विलासराव तांबे यांचे नाव देण्यात आले होते.

याप्रसंगी श्री. रमेश चव्हाण संपादीत ‘महात्मा फुले सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन भाग ३’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘सत्यशोधकांचे ओतूर’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी तर सूत्रसंचालन ह.भ.प. शामसुंदर सोन्नर यांनी केले.


सांस्कृतिक दहशवादाविरोधातील लढाई लढली पाहिजे : चंद्रकांत वानखेडे 


मुंबई :  सांस्कृतिक वर्चस्ववादाला दहशतवादाचे स्वरूप दिले जात आहे. आता काही बोलले तरी देशद्रोही ठरवले जाते. काँग्रेसच्या काळात असं नव्हतं. सध्याचा काळ हा फेकाफेकीचा असून, ते फेकत गेले आणि आपण झेलत गेलो. त्यामुळे सांस्कृतिक दहशवादाविरोधातील लढाई लढली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व लेखक चंद्रकांत वानखडे यांनी केले. सत्यशोधक समाजाच्या एक दिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात चंद्रकांत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. महात्मा फुले आणि महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही महत्त्वाचे का? या परिसंवादाच्या विषयावर ते बोलत होते.

 

वानखेडे म्हणाले की, गांधी वध हा शब्द वापरला जातो. वध हा शब्द राक्षसासाठी वापरला जातो. मग नथुराम परमेश्वर होता का? असा प्रश्न पडतो. नरेंद्र दाभोलकर, शरद जोशी, लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी देखील आपल्या लिखाणात ‘गांधी वध’ हा शब्द वापरला. शब्दप्रभूंना ‘वध’ या शब्दाचा अर्थ समजला नसेल किंवा त्यांनी समजून उमजून घेतला नसेल, असे वाटते. सांस्कृतिक वर्चस्ववाद पूर्वी होता. आता त्यांच्या हातात सत्ता आल्याने सांस्कृतिक वर्चस्ववादाला दहशतवादाचे स्वरूप दिले जात आहे. शरद पवार विजयी झाले तरी चाणक्य नितीचा विजय आणि फडणवीस विजय झाले तरी चाणक्य नितीचा विजय म्हणजे वर्चस्ववाद त्यांचाच. संघाची निर्मिती कशी झाली या विषयी बोलताना ते म्हणाले की, गांधींनी स्वातंत्र्याची चौकट आखली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यावेळेस मांडणी केली होती. ज्याअर्थी पेशव्यांचे राज्य गेलेले आहे, ज्याअर्थी चित्तपावन ब्राह्मणांचे राज्य गेलेले आहे, त्याअर्थी चित्तपावन ब्राह्मणांनी सत्ता उपभोगली पाहिजे. टिळकांनी ही चौकट स्वीकारली म्हणून ते लोकमान्य होते. गांधी नावाचा माणूस येतो तो पहिला प्रश्न विचारतो, ‘स्वातंत्र्य कशाचे आणि कशासाठी?’ येथून पोटदुखी सुरू होते. माझा स्वातंत्र्याचा अर्थ या देशाच्या सर्वोच्च पदावर भंग्याची मुलगी बसली पाहिजे, हा आहे, असे गांधी म्हणतात. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला. सगळ्या टरफल्याच्या गोष्टी ऐकून मोठे झालो पण हे कोणी सांगितले नाही. टिळकांनी १९१७ साली भाषणात म्हटले होते की, विधीमंडळात जाऊन शेतकरी नांगर धरणार आहे का?, शिंपी शिलाई मशीन चालवणार आहे का? वाणी काय तराजू धरणार आहे? आम्हाला हे सांगण्याची गरज नाही, विधीमंडळात जाऊन कोण काय दिवे लावणार, हे आम्हाला माहीत आहे.


माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञावंताने महात्मा फुलेंना गुरू मानले. एका बाजूला कबीर, दुसर्‍या बाजूला बुध्द आणि त्यांच्या लेव्हलवर फुलेंना नेऊन ठेवणे. यामध्ये आंबेडकरांचा दूरदृष्टीकोन, त्यांचा मोठेपणा दिसून येतो. यावरून फुले किती मोठे होते, हे दिसते. त्यामुळेच महात्मा फुले हे विचारवंतांचे विचारवंत होते. फुले हे भारतातील पहिले विचारवंत पहिले समाज सुधारक, पहिले समाज क्रांतिकारक होते म्हणून फुले खूप मोठे होते.


महाराष्ट्रात विचारवंत जास्त आणि सामान्य लोक कमी असं प्रमाण आहे ही शोकांतिका आहे. एक पीएचडी घेतली, कॉलेजमध्ये पाच दहा वर्ष शिकवलं. एखादी पदवी काय मिळवली. त्याला विचारवंत नाही म्हणत. विचारवंतांची व्याख्या आंबेडकरांनी रानडे-गांधी-जिना यांच्यामध्ये केली होती. त्या अर्थाने फुले अशिक्षित म्हटले पाहिजेत. तरीसुध्दा फुले प्रचंड विचारवंत होते. आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले. म्हणून फुले विचारवंताचे विचारवंत ठरतात.  जर डॉ आंबेडकरांनी  फुलेंना गुरू मानले नसते तर आजही फुले मंडईच्या नावाच्या पुढे गेले नसते. मंडई दिसली की फुलेंचे नाव दिसते असेही मुणगेकर म्हणाले. पहिलीपासून ते दहावी पर्यंतच्या पुस्तकात फुले शाहू आंबेडकर ही नावे काढून टाकलेली आहेत. त्याच्या ऐवजी हेडगेवार, गोळवळकर, सावरकर, टिळक आहेत. रानडेसुध्दा नाहीत असेही मुणगेकर यांनी सांगितले.

 

अ‍ॅड. शंकर निकम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याला १९९ वर्षे पूर्ण झाली त्यावेळी सत्यशोधक समाजाची स्थापना होते, हे लक्षात घेतले पाहिजे. महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विचारांची एक चौकट निर्माण केली. ती चौकट भगवान बुध्दांपर्यंत घेऊन जाते. भगवान बुध्द ते १९४७ चा प्रवास हा भारतीय घटनेत प्रतिबिंबीत आहे. काही दिवसांपूर्वीच नवीन संसदेचा प्रवेश झाला. आपल्या राष्ट्रपती तेथे नव्हत्या. यापुढे असं होऊ नये यासाठी महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा विचार आपल्याला घ्यावा लागणार आहे, असे निकम म्हणाले. 


 विश्वास उटगी म्हणाले की, सत्यशोधक धर्म हा मानवतावादी धर्म होता. आधीच्या सर्व धर्माना त्यांनी एक प्रकारे नाकारले आहे. ते नास्तिक नव्हते त्यांनी एक ईश्वराची कल्पना मांडली. शिक्षण आणि समानतेच्या तत्वामध्ये बांधण्याचे काम फुलेंनी केले. सत्यशोधक धर्म हा निश्चितच वेगळा आणि आधुनिक आहे. जातीभेद विरहीत समाज निर्माण करण्याची त्यांची प्रक्रिया हे दोघांचे कर्तृत्व होतं. महात्मा फुले आणि महर्षि विठ्ठल शिंदे यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांनी पुढे नेले.  संसदीय लोकशाही त्यांच्या विचारांचे फलीत आहे. प्रत्येक नागरिकाला एक मताचा अधिकार आहे. पण भटक्या विमुक्तांना आजही मतदानाचा अधिकार मिळालेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर मनुस्मृती आणायची असल्याने संविधानात बदल केला जात असल्याचेही उटगी म्हणाले.


पुरोगामीत्वाचे विचार ठेचण्याचे प्रयत्न सुरू : राही भिडे


मुंबई : सध्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून वर येईल का? असं वातावरण आहे. पुरोगामीत्वाचे विचार दाबवण्याचे, ठेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे दीडशे वर्षांनी आज काय फरक झाला, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सत्यशोधकाची चळवळ समजून घेण्यात आम्ही कमी पडलो का? असा प्रश्न  यानिमित्ताने उपस्थित होत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी केले. सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापनदिन व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय अधिवेशनातील दुसर्‍या सत्रात त्या बोलत होत्या.  


भिडे म्हणाल्या की, धर्मांधाकडून दलित, उपेक्षित, महिलांचे शोषण सुरू आहे. त्या विरोधात आवाज उठविण्यात आम्ही कमी पडलो का याचे आत्मपरीक्षण केल्याशिवाय चळवळ पुढे जाणार कशी? आपण खूप बोलतो. प्रत्यक्षात ते येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनाच्या दृष्टीकोनातून हे वातावरण महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे. आपला आवाज बुलंद झाला पाहिजे. आपण हिंदुत्वावाद्यांबरोबर तडजोड करतो. त्यांना बळ देतो आणि पुरोहितशाही परत येते. घड्याळाचे काटे उलटे फिरतात का याबद्दल चिंता व्यक्त करतो, मग आपणही ढोंगीपणा करतो का? असाही प्रश्न पडतो हा बोटचेपेपणा नाही का? अशी रोखठोक भूमिका भिडे यांनी मांडली. या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

 कोणतीही चळवळ असो. महिलांनी तीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. अलिकडच्या काळात स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती, महागाईचा प्रश्न या सगळ्यांंमध्ये महिलांचा सहभाग आहे तसा तो दीडशे वर्षापूर्वी होता. महिलांनीसुध्दा या चळवळीत हिरीरीने भाग घेतला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या चळवळी सुरू केल्या त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा सहभाग होता, असे भिडे म्हणाल्या.  सावित्रीबाईंची जयंती देशभर महिला मुक्ती दिन म्हणून साजरी केली पाहिजे. सावित्रीबाईंच्या ऐवजी वटसावित्रीची पूजा आपण करतो, हे दुर्दैव आहे. देशातील पहिली महिला संपादक पत्रकार तानुबाई बिर्जे होत्या, असेही त्यांनी सांगितले. तानुबाई बिर्जेंच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली, मात्र अजून अंमलबजावणी झाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी पूनम कनोजिया, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत काम करणारे भाऊ कोंडाजी डुंबरे यांचे वंशज सुधाकर डुंबरे, पाण्याच्या प्रश्नावर काम करणारे शेलार, काही एकल महिला यांचीही भाषणे झाली. यावेळी सत्यशोधकी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.


सावित्री हा एक विचार

सावित्री हा एक विचार आहे. आता तो कुठे आहे? असा प्रश्न विचारतानाच थिएटर ऑफ रिलेवन्सच्या ग्रुपने मंजूल भारद्वाज लिखीत व दिग्दर्शित लोकशास्त्र सावित्री ही लघुनाटिका सादर केली. अश्विनी नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपने या नाटिकेच्या माध्यमातून उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. नाटिकेत अश्विनी, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे व प्रांजल गुडीले सहभागी झाल्या होत्या. थिएटर ऑफ रिलेवन्स हा ग्रुप गेली ३२ वर्षे समाज प्रबोधन करत आहे.

 

प्रबोधनात्मक सादरीकरण

संविधान प्रचारक आणि थिएटर ऑफ रिलेवन्स या ग्रुपने प्रबोधनात्मक सांस्कृतिक सादरीकरण करून अधिवेशनाचे दुसरे सत्र गाजवले. संविधान प्रचारकांकडून सावित्रीबाई फुले यांच्यासह जिजाऊ व रमाई यांच्या कार्याची महती पटवून देण्यात आली. संविधान प्रचारकांच्या सादरीकरणामध्ये आकाश पवार, अमित काझी आणि शीतल भंडारी यांचा समावेश होता.

 भिडे वाड्याचे स्मारक करण्याचा ठराव मंजूर

 अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात पुण्यातील भिडे वाड्याचे रुपांतर महात्मा फुलेंच्या स्मारकात करण्यात यावे, असा ठराव एकमताने मंजूर झाला. अ‍ॅड. शंकर निकम यांनी हा ठराव मांडला. तर राही भिडे यांनी त्याला अनुमोदन दिले.


...तेव्हा लालबागचा राजा झोपला होता का?  समारोपाच्या सत्रात ज्ञानेश महाराव यांचा हल्लाबोल

 मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगारांचा संप झाला. त्यांच्या दहा लाख कुटुंबियांची उपासमार सुरू झाली. त्या गिरणी कामगारांची मुले गँगस्टर बनली. यातील बहुसंख्य लोक हे लालबाग-परळमधील होते. तुमचा लालबागचा राजा नवसाला पावतो तर मग त्या संपकाळात तो झोपला होता का? असा खणखणीत सवाल समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी विचारला.

 अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला चढविताना त्यांनी उच्चवर्णियांच्या देवधर्माविषयीच्या खोटारड्या प्रचाराचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा फुले म्हणाले होते की, देवळाला दार नको आणि देवापर्यंत पोहोचण्यासाठी भटरुपी दलाल नको. इतक्या सोप्या भाषेत महात्मा फुलेंनी आपले विचार व्यक्त केले होते. पण आजही हे विचार लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाहीत, हे आपले दुर्दैव आहे.

 महात्मा फुलेंचे मोठेपण सांगताना महाराव म्हणाले की, फुले हे महात्मा कसे झाले, हे समजून घ्या. फुले दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. तेव्हा त्या काळात महात्मा फुलेंनी स्वत:ची तपासणी करून घेतली. त्यांच्यात काही दोष आढळला नाही. मग त्यांनी पत्नीची तपासणी करवून घेतली. तिच्यात मात्र दोष आढळून आला. तेव्हा सावित्रीबाईंच्या आईने म्हणजे महात्मा फुलेंच्या सासूने त्यांना मूल होण्यासाठी दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला. महात्मा फुलेंच्या इतर नातेवाईकांनी देखील तसाच आग्रह केला. तेव्हा महात्मा फुलेंनी दुसरे लग्न करण्यास ठामपणे नकार दिला. ते म्हणाले, माझे सावित्रीवर प्रेम आहे. मी दुसरे लग्न करून तिला सवत आणणार नाही. नातेवाईकांनी पुन्हा आग्रह करताच त्यांनी नातेवाईकांना प्रतिप्रश्न केला की, माझ्यात दोष आढळला असता तर तुम्ही मला सवत्या आणला असता का? त्यांच्या या प्रश्नावर सर्वच निरुत्तर झाले. मनाच्या अशा या मोठेपणामुळे आणि सामाजिक सुधारणांबाबतच्या दूरदृष्टीपणामुळे फुले हे महात्मा झाले. 

ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी आभार मानल्यानंतर सत्यशोधक समाजाच्या या एक दिवसीय अधिवेशनाचा समारोप झाला.

------