मोदीं विरोधात वज्रमूठ : आज पाटण्यात देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक !

Santosh Gaikwad June 23, 2023 10:28 AM


मुंबई : 2024च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यासाठी आज बिहारच्या पाटण्यात  सर्व विरोधी पक्षांची बैठक होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे.  त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून हटवून २०२४ मध्ये देश भाजपमुक्त करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष सरसावले आहेत. सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठक आयोजित केली आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवीत भाजपचा दारूण पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कर्नाटकात तळ ठोकूनही त्यांना यश मिळालं नाही त्यामुळे विरोधी पक्षांचे बळ आणखीनच वाढले आहे. २०२४ ला लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप विरोधात विरोधकांकडून  मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.


या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.


2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार जागा कशा लढवायच्या ?  या बाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचा राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जात आहे.लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांची म्हणणे आहे.