भारतीय स्टेट बँकेची ८० कोटींची फसवणूक, खासगी कंपनीवर गुन्हा

Santosh Gaikwad July 10, 2023 10:28 PM


मुंबई : भारतीय स्टेट बँकेची ८० कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने एका खासगी कंपनी, संचालक आणि सरकारी कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेसर्स पार्थ फॉईल्स (मे.पीएफपीएल), संचालक पार्थ बिजॉय दत्त आणि अज्ञात सरकारी कर्मचारी तसेच इतर व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. 


 सदर कर्जदार कंपनी आणि तिच्या संचालकांनी बँकेकडून अधिक प्रमाणात कर्ज मिळवण्यासाठी फेरफार केलेली स्टॉक-बुक कर्जविषयक कागदपत्रे, विक्री, उत्पन्न तसेच नफा यांच्या संदर्भातील फुगवलेले आकडे आर्थिक दस्तावेज सादर करून कर्ज सुविधेचा लाभ घेतला आणि कर्जाची संपूर्ण रक्कम अंतिम कारणासाठी न वापरता इतरत्र वळवली. या व्यवहारातून बँकेला सुमारे 80.73 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 


मुंबई, गाझियाबाद तसेच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातल्या बड्डी या ठिकाणासह विविध ठिकाणी राबवलेल्या छापासत्रांमधून काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संगणकाची हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.