सातव्या बिमटेक इन्शुरन्स परिसंवादात हवामान बदलाचा विमा आणि शाश्वततेवर होत असलेल्या परिणामांवर चर्चा

Santosh Sakpal November 06, 2023 09:25 PM

 मुंबई – बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नोलॉजी (बिमटेक) या भारतातील आघाडीच्या बी- स्कूल्सपैकी एका बी- स्कूलने मुंबईत सातव्या बिमटेक विमा परिसंवादाचे आयोजन केले होते. ‘शाश्वत मूल्य साखळी विस्तारताना – मालमत्ता, कॅज्युअल्टी, आरोग्य आणि जीवन विम्यावर होणारा हवामान बदलाचा परिणाम’ ही या परिसंवादाची संकल्पना होती. हवामान बदल, विमा आणि शाश्वतता यांच्यातील महत्त्वाच्या संबंधांविषयी यावेळी माहितीपूर्ण चर्चा झाली.

बिमटेकचे संचालक डॉ. एच. चतुर्वेदी यांनी आपल्या हृदयस्पर्शी मनोगतासह विमा परिसंवादाची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय ग्राहक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रो. बेजॉन कुमार मिश्रा यांनी परिसंवादाच्या संकल्पनेवर आधारित विचार मांडले. एलआयसी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्री. एम. आर. कुमार यांनी आपल्या भाषणातून चर्चेला दिशा दिली.

‘इंडिया इन्शुरन्स रिपोर्ट’चे यावेळी अनावरण करण्यात आले. त्यामध्ये भारतातील विमा बाजारपेठेच्या सद्य स्थितीविषयी माहिती देण्यात आली. हे अनावरण कार्यक्रमाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक ठरले.

आंतरराष्ट्रीय ग्राहक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रो. बेजॉन कुमार मिश्रा म्हणाले, ‘आजच्या जगात आपण शाश्वतता, नाविन्य आणि प्रत्येकाच्या स्वास्थ्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एकत्रितपणे काम करत, भागधारकांचा सल्ला घेऊन आणि नव्या भविष्याची निर्मिती करूया जिथे कोणी मागे राहाणार नाही. महत्त्वाकांक्षी ध्येयाच्या दिशेने काम करताना लक्षात ठेवा, की यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो आणि ग्राहक समाधान ही गुरूकिल्ली आहे. आव्हानांवर मात करण्याची आणि आरोग्यसेवा सर्वांसाठी वाजवी दरात उपलब्ध करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. एकत्रितपणे काम करण्याची, नाविन्यनिर्मिती करण्याची व भारत तसेच जगासाठी उज्ज्वल भविष्य उभारण्याची प्रतिज्ञा करूया.’

एलआयसी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्री. एम. आर. कुमार म्हणाले, ‘हवामान बदलामुळे विविध आपत्तीतून होणाऱ्या नुकसानीचे जास्त प्रमाण, मालमत्ता कव्हरेजचे अपुरेपण आणि व्यवसायातील अडथळ्यांमुळे होणारे मोठे नुकसान यांचा विमा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होणार आहे. हवामान बदलामुळे येणारा पूर आणि गरमीचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. समुद्राची पातळी वाढल्यामुळे मुंबई शहराला २०५० पर्यंत ४९ ते ५० अब्ज आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. विमा कंपन्यांनी शारीरिक व ट्रान्झिशन जोखमीचा समावेश करून त्याचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधणे आवश्यक आहे. धोरणकर्त्यांनी विमा कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य कव्हरेजचा विस्तार करणे गरजेचे असू शकते.’

सर्व जे. बी. बोडा समूह कंपन्यांचे समूह अध्यक्ष अतुल डी. बोडा म्हणाले, ’८० वर्षांच्या अथक मेहनतीनंतर जे. बी. बोडा समूहाचा विकास आणि यश पाहाण्याचे भाग्य मला लाभले. असामान्य टीममुळे हा प्रवास शक्य झाला. मी आमचे सर्व ग्राहक, भागधारक आणि विशेषतः आयुष्याची जोडीदार व कौटुंबिक सदस्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे. बिमटेककडून मिळालेल्या या सन्मानानंतर नव्याने तयार झालेल्या उर्जेसह पुढे जाण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी मी उत्सुक आहे.’

प्रो. (डॉ.) अभिजित के. चट्टोराज, चार्टर्ड इन्शुरर, डीन – एसडब्ल्यूएसएस, प्रोफेसर आणि अध्यक्ष, पीजीडीएम- आयबीएम, बिमटेक यांनी पहिल्या सत्राचे मॉडरेटिंग करताना अंडररायटिंगमधील नेट झिरो ट्रान्झिशनचे महत्त्व अधोरेखित केले. पॅनेलने हवामान जोखमींमुळे होणारे नुकसान कसे कमी करायचे यावर चर्चा केली. मालमत्ता व दुर्घटना अंडररायटर्सनी या स्थित्यंतरातून तयार होणाऱ्या विकासाच्या संधींचा लाभ करून घेण्यासाठी धोरणात्मक पद्धतीने काम करावे. अंडररायटर्सनी त्यांचे कार्बन फुटप्रिंट्स कमी करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये अडजस्टमेंट करणे आवश्यक आहे.

तीन सत्रांपैकी पहिले सत्र ‘हवामान बदल, विमा आणि सर्वसमावेशकता’ याविषयी होते, तर दुसऱ्या सत्रामध्ये ‘विमा क्षेत्रातील नाविन्य आणि वातावरण बदल’ या विषयावर भर देण्यात आला. तिसरे सत्र ‘जीवन आणि अर्थार्जन विमा आणि ग्राहक’ या संकल्पनेभोवती फिरणारे होते.

परिसंवादाच्या शेवटी जे. बी. बडोदा समूह कंपन्यांचे समूह अध्यक्ष श्री. अतुल डी. बोडा यांना प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमाचा कळसबिंदू ठरला. त्यांनी आपल्या स्वीकृती भाषणात हवामान बदलाशी संबंधित आव्हानांशी उद्योगक्षेत्राशी असलेली बांधिलकी यावर विचार व्यक्त केले.