गुटखा, पान मसालाची बेकायदा विक्री करणाऱ्या ४८ जणांना अटक

Santosh Gaikwad December 08, 2023 06:33 PM


मुंबई  : मुंबईत गुटखा, पान मसाला व सुगंधीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री करणाऱ्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

12 दिवसांत दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील विविध ठिकाणांहून तब्बल 3 लाख 84 हजार 405 रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखू हे पदार्थ जप्त केले आहे. कारवाई केलेल्या या दुकानांतून गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे 48 नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तसेच या प्रकरणी 42 दुकानांना टाळे ठोकून  48 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासान विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निदर्शनानुसार व आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने शहरातील गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 12 दिवसांत शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यानुसार मुंबईतील वांद्रे परिसरातील हिल रोड, बेहरामपाडा, खेरवाडी रोड, ए.के. मार्ग या ठिकाणांवरील 10  दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे घाटकोपर पश्चिमेकडील लालबहाद्दूर शास्त्री मार्ग आणि अकबर लाला कम्पाऊंड, साकीनाका येथील पॅकवेल कम्पाऊंड, लालबाग येथील चिवडा गल्ली, नागपाडा येथील अरब गल्ली, कामाठीपुरा, जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा, बोरिवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कलजवळ, परळ एस. टी आगराजवळ, मुलुंड आणि मालाड या भागात ही कारवाई करण्यात आली.


स्थानिक पाेलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने ३ लाख ८४ हजार ४०५ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. कारवाई केलेल्या या दुकानांतून गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे ४८ नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तसेच या प्रकरणी ४२ दुकानांना टाळे ठोकून ४८ जणांना अटक केली आहे .