राज्यात ४ लाख नवीन मतदार वाढले

Santosh Gaikwad January 24, 2024 07:20 PM


मुंबई, दि. २३: निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत ऑक्टोबर २०२३  प्रारुप मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतकी झालेली आहे. 


 त्यानुसार १ लाख ०१ हजार ८६९ पुरुष मतदार तर ३ लाख ०८ हजार ३०६ स्त्री मतदारांची आणि ५७२ तृतीयपंथी मतदारांची वाढ झालेली आहे.   तसेच भटक्या  व विमुक्त जमातीच्या एकूण १६ हजार ४४३ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.


  यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत  मतदारांची यादी अद्ययावत करण्यात आली असून, याबाबत आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी  देशपांडे यांनी माहिती दिली.


  महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९१७ वरून ९२२ इतके झाले आहे.


 मतदारांनी आपले नाव जुन्या मतदान केंद्रात नाव नसल्यास नजीकच्या मतदार केंद्रात असल्याची खात्री करून घ्यावी किंवा व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडावा व आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी. 


मतदार ऑनलाईन पद्धतीनेही नाव नोंदवू शकतात त्याचाही मोठ्या प्रमाणात मतदारांनी वापर करावा.  ज्या युवकांचे वय एप्रिल महिन्यात १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा तरुणांनी आगाऊ नोंदणी करण्यात सांगितले होते. त्यांनाही एप्रिल नंतर मतदान करता येणार आहे. यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ होणार असल्याचेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.



या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ६ लाख ७० हजार ३०२ मतदाराची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात ८ लाख ३३ हजार ४९६ मतदारांची वाढ झालेली आहे.  प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ३ लाख ४८ हजार ६९१ (०.३८ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १० लाख १८ हजार ९९३ (१.१२ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या १ कोटी ५५ लाख ११ हजार ३७६ (१७.८ टक्के) होती, ती अंतिम यादीत १ कोटी ६३ लाख ४४ हजार ८७२ (१७.९१ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरामुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.


जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. नुसार ११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.


त्यापैकी ऐंशीपेक्षा अधिक वय असलेले ४ लाख ९२ हजार ३९५ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याची नावेही वगळण्यात आलेली आहेत, त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये ९ लाख ०५ हजार ५५९ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज, PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत २ लाख ८४ हजार ६२० मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे.

तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज DSE) २ लाख ५४ हजार ४६० मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून ७४ हजार ४२६ मतदाराची नावे वगळण्यात आलेली आहेत.  

  


दिव्यांगांसाठी गृहसंकुलात १५० मतदान केंद्रे 

 

यंदाच्या अंतिम मतदार यादीत कातकरी (काथोडी), माडिया गोंड, कोलाम या समूहातील ३८,८७६ मतदारांचा समावेश आहे. दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  शहरी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांतील १५० मतदान केंद्रे ही मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये ठेवण्यात आलेली आहेत.


सहा क्रमांकाचा अर्ज भरा 

  

मतदारांनी 'मतदाता सेवा पोर्टल' या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे . तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी केले.


०००