गुरु आणि दर्श यांच्यात जेतेपदासाठी चुरस ३६० वन वेल्थ ज्युनियर ग्रां. प्रि. चेस सीरिज

Santosh Sakpal December 25, 2023 07:50 PM



मुंबई: 
अव्वल मानांकित गुरु प्रकाश आणि दुसऱ्या मानांकित दर्श शेट्टी यांनी महत्त्वाच्या फेरीत आपापल्या लढती जिंकत ३६० वन वेल्थ ज्युनियर ग्रां. प्रि. चेस सीरिजमध्ये जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. आता अंतिम फेरीत त्यांची लढत विजेतेपदासाठी होईल.

गुरु प्रकाश याने प्रथमेश गावडे याचे आव्हान परतवून लावले. गुरु प्रकाश याने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना, प्रथमेशच्या किंग पॉन ओपनिंग पद्धतीला सिसिलियन बचाव पद्धतीने प्रत्युत्तर दिले. सुरुवातीलापासूनच डावावर प्रभूत्व गाजवत, गुरुने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळात अचूकपणा नसल्याचा फायदा उठवत अवघ्या १७ चालीत विजय साकारला.
 
दुसऱ्या पटावर, दर्श शेट्टीने कुश अगरवाल याला पराभवाचा धक्का दिला. दर्शचा घोडा मारण्याच्या नादात कुश अगरवालने केलेल्या चुका त्यालाच भोवल्या. परिणामी त्याला २३ चालींतच पराभव पत्करावा लागला. आता गुरु, दर्शसहित अथर्व सोनी, शौनिश जयस्वाल आणि इशान तेंडोलकर हे पाच जण पाच गुणांसह आघाडीवर आहेत.
 
चार फेऱ्यांनंतर संयुक्तपणे आघाडीवर असलेल्या अर्णव थत्ते याला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले आहे. अडीच लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर तब्बल ४.५ गुण मिळवत एकूण सात बुद्धिबळपटूंनी संयुक्तपणे तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

सहाव्या फेरीअखेर महत्त्वाचे निकाल
प्रथमेश गावडे (४*) पराभूत वि. गुरु प्रकाश (५*)
दर्श शेट्टी (५*) विजयी वि. कुश अगरवाल (४*)
पर्व हाकानी (४) पराभूत वि. सोनी अथर्व (५)
अर्ण‌व थत्ते (४) पराभूत वि. इशान तेंडोलकर (५)
शौनिश जयस्वाल (५) विजयी वि. परम जालान (४)
मयांक राणा (४*) बरोबरी वि. पुर्वान शहा (४*)
साम्विद पासबोला (४) बरोबरी वि. रिवान छेडा (४*)
आरव कपूर (३*) पराभूत वि. अर्जुन सिंग (४*)
श्रावण अग्रवाल (४*) विजयी वि. मुकुल राणे (३*)
पलाश मापारा (३*) पराभूत वि. तन्मय मोरे (४*)