आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य शासनाकडून जीआरचा धडका : दोन दिवात २६९ शासन निर्णय जारी !

Santosh Gaikwad March 10, 2024 07:43 PM



मुंबई :  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा (GR) धडाका पाहायला मिळत आहे.  दोन दिवसांत तब्बल २६९ शासन निर्णय  घेण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटोपण्याची राज्य सरकारला घाई  झाल्याचे दिसून येत आहे. आता सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतली जाण्याची अपेक्षा आहे.

 आठवडाभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून  तब्बल २६९ शासन निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश आहे.  लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, आणि त्यामुळेच राज्य सरकारने दि ६  आणि ७  मार्च या दोन दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल २६९ शासन निर्णय जारी केले आहेत. ७  मार्च रोजी १७३  शासन निर्णय, तर ६ मार्चला ९६  शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. 


 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास नवीन विकास कामांची घोषणा करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकराने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णयाचा धडाका लावला आहे. निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण केल्यास निवडणुकीत त्या निमित्ताने मतदारांच्या समोर जाता यावे आणि त्यावरून प्रचार करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या आधी असे निर्णय घेतले जातात. यापूर्वी देखील आचारसंहिता लागण्यापूर्वी असे निर्णय घेण्यात आले आहेत.