शिवडी न्हावा शेवा सेतूवरील प्रवासासाठी आकारला जाणार २५० रुपयांचा टोल

Santosh Gaikwad January 05, 2024 05:07 PM



मुंबई, दि. ४ः 
मुंबई ते पनवेलला जोडणाऱ्या शिवडी न्हावा शेवा सेतूवरून प्रवास करण्यासाठी वाहन चालकांकडून २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परतीच्या प्रवासापासून महिन्यापर्यंतच्या पास करिता वाहनचालकांना टोल दरात सवलत दिली जाईल. एक वर्षांकरिता  ही टोल आकरणी सुरू राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. वाहन चालकांच्या खिशाला मात्र सरकारच्या या निर्णयामुळे चांगलीच कात्री लागणार आहे.

भारतातील सर्वात लांब पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे  'अटल सेतू' असे नामकरण केले आहे. मुंबईतून नवी मुंबई आणि उरण, विस्तारित पुण्याचा काही भाग, अलिबाग यांना जोडणारा हा मार्ग लवकरच लोकांसाठी खुला होईल. मात्र, त्यापूर्वीच सेतूवर कर आकारणीचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही सर्वसाधारणपणे टोल दराच्या नियमाप्रमाणात ५० टक्क्यांची टोलमाफी असेल. त्यामुळे कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारले जातील. तसेच वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता परतीचा पास एकेरी टोलच्या दिडपट, दैनिक पास एकेरी टोलच्या अडीच पट आणि मासिक पास एकेरी टोलच्या पन्नास पटपर्यंत सूट देण्यात येणार आहे. अटल सेतूसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.  



अटल सेतू उभारणीकरिता एकूण २१ हजार २०० कोटी इतका खर्च आला असून त्या पैकी १५ हजार १०० कोटी इतके कर्ज घेतले आहे. प्रकल्पामुळे पनवेल पासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान ५०० रुपयांची बचत होईल, असा सरकारचा दावा आहे.

अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या ० ते ४ किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक व अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र आणि माहूल येथील तेल शुद्धीकरण केंद्राच्या ४ ते १० किलोमीटर परिसरात पारदर्शक यंत्रणा बसवली आहे.