सरकार संभ्रमात ध्वजारोहण कोण करणार ? एक वर्षानंतरही राज्यातील १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाही : नाना पटोलेंचा हल्लाबोल

Santosh Gaikwad August 11, 2023 05:58 PM


मुंबई, दि. ११ ऑगस्ट : राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण त्यात पुन्हा सुधारणा करावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.


टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तीन पक्षांच्या या सरकारला जनतेच्या समस्यांचे काहीही पडलेले नाही. राज्यातील प्रशासन कोलमडले आहे, तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केले जात आहे, हे चांगले लक्षण नाही. प्रशासनावर सरकारचा वचक नसल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, आधी अतिवृष्टी झाली तर आता पाऊसच गायब झाला आहे. खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. जनता बेहाल असताना त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी सरकारी तिजोरी कोण जास्त लुटतो याची तीन पक्षात स्पर्धा सुरु आहे. 


मख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात एकाच दिवसात ५ रूग्णांचे मृत्यू होतात हे दुर्दैवी आहे. राज्याचे आरोग्य बजेट एक टक्का आहे ते वाढवून १५ टक्के केले पाहिजे. राज्यातील आरोग्य सेवाच आजारी पडली आहे, रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, औषधे नाहीत ही अवस्था आहे. दुसरीकडे फक्त जाहिराती सुरु आहेत. लोकांना साध्या वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत, केवळ मुठभर लोकांचे हे सरकार आहे. राज्यात ७५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सरकार शिक्षक भरतीच्या फक्त घोषणा करत आहे. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे, शाळा ओस पडल्या आहेत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणही मिळत नाही. भाजपाच्या या कारभाराला जनता कंटाळली असून आता जनताच त्यांना सत्तेतून बाहेर फेकून देईल, असेही नाना पटोले म्हणाले.