श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Santosh Gaikwad November 27, 2023 10:05 PM


 मुंबई  : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याणाच्या मार्गातून मानवतेची सेवा केली आहे. त्यांचे मुंबईत निर्माण करण्यात आलेले स्मारक लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यांनी आज येथे काढले.

           

भारतीय संत श्रीमद् राजचंद्रजी यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त श्रीमद् राजचंद्रजी मिशन, धरमपूरच्या वतीने आयोजित आत्मकल्याण पर्व कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते चर्नी रोड स्थानकाजवळील रॉयल ऑपेरा हाऊस जवळ उभारलेल्या श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण आणि मॅथ्यूज रोडचे नामकरण श्रीमद् राजचंद्रजी मार्ग असे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी, मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी, उपाध्यक्ष आत्मर्पीत नेमीजी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. समारंभात उपराष्ट्रपती   धनखड यांना पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते ‘जनकल्याण हितैशी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

            उपराष्ट्रपती  धनखड म्हणाले की, महात्मा गांधींचे अध्यात्मिक प्रेरणास्थान असलेले श्रीमद् राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांचे कार्य श्रीमद् राजचंद्रजी मिशन व त्यांचे संस्थापक गुरुदेवश्री राकेशजी अविरतपणे चालवित आहेत. प्रत्येक सजीवासाठी ही पृथ्वी आहे.फक्त मानवासाठीच नाही, ही त्यांची शिकवण असून श्रीमद् राजचंद्रजी मिशनचे पशुवैद्यकीय दवाखाना हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात श्रीमद् राजचंद्रजी यांनी  आपल्या कार्यातून ठसा उमटवला. मुंबईतील स्मारक आणि मार्ग यामुळे राजचंद्रजी यांची आठवण देत राहील व लोकांना प्रेरणा देत राहिल. महात्मा गांधी व सध्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर श्रीमद् राजचंद्रजी यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे.

            महात्मा गांधी हे मागील शतकातील महापुरूष होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अंहिसेने इंग्रजापासून आपल्याला स्वातंत्र्य दिले. तर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळ्या प्रगतीपथावर नेऊन ठेवले, असेही उपराष्ट्रपती  धनखड यांनी यावेळी सांगितले.