मुंबईत १५ हजार भटक्‍या श्‍वानांचे होणार रेबिज लसीकरण

Santosh Gaikwad September 29, 2023 05:39 PM



 मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ प्रशासकीय विभागांमधील १५ हजार भटक्‍या श्‍वानांचे होणार रेबिज लसीकरण 'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार  राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण होणार

'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि १५ स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ६ प्रशासकीय विभागातील १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात 'क्‍यूआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्‍यात येणार आहेत. परिणामी, क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणाऱ्याचा (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण मोबाईल ॲपआधारित होणार असून राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे.  
..

२८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या आंतरराष्ट्रीय रेबिज दिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी विविध स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर १५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २९ सप्टेंबर २०२३ ते १० ऑक्टोबर २०२३ या १० दिवसांच्या कालावधीत पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एस आणि टी विभागातील जवळपास १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. केवळ लसीकरणावर न थांबता श्‍वानांच्‍या आरोग्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका आता अत्‍याधुनिक उपाययोजनादेखील राबविणार आहे.

सन २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्‍वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी,  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या श्‍वानांच्‍या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे.

दर दहा वर्षांनी श्वान जनगणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या श्‍वानांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहीम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या श्‍वानांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे. ..मोबईल ॲपच्या माध्यमातून भटक्या श्वानांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या सहायाने श्‍वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणीदेखील करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात आलेल्या श्वानाचा फोटो, लसीकरण करण्यात आलेले ठिकाण आणि त्याच्या आरोग्याची माहिती या मोबाईल ॲपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.
..
या उपक्रमासाठी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, द वेलफेयर ऑफ स्ट्रे डॉग्स, मिशन रेबिज, वर्ल्ड वाइल्ड वेटरनरी सर्विस, बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट प्राण्यांचे रुग्णालय, अहिंसा, जीवदया अभियान, मुंबई ॲनिमल असोसिएशन, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, उत्कर्षा ग्लोबल फाउंडेशन, ॲनिमल मॅटर्स टू मी, जीव रक्षा अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्ट, जेनिस स्मिथ ट्रस्ट, वर्क फॉर केअर ॲनिमल फाउंडेशन आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या स्‍वयंसेवी संस्था निःशुल्क सेवा देत आहेत. तसेच बोरिजर इंगलहाईम ही संस्था मोफत लस पुरवठा करणार आहे.  
===