राज्यातील १२० शेतकरी जाणार परदेश दौऱ्यावर

Santosh Gaikwad January 12, 2024 10:04 PM



मुंबई, दि. १२ः विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रांची माहिती घेण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. सरकारने याकरिता दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचा शासन आदेश सरकारच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी जारी केला.


राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देश, शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याच बरोबर शेतीसाठी उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. तेथील संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढविण्यासाठी परदेश दौऱ्याचे आयोजन केले जाते. २००४ पासून ही योजना राज्यभरात राबवली जाते. कोरोना संकटामुळे दौरा बंद होता. आता पुन्हा एकदा हे दौरे सुरू केले जाणार आहे. २०२३- २४ च्या आर्थिक वर्षाकरिता सरकारने २ कोटींचे अनुदान दिले आहे. त्यापैकी ७० टक्के खर्चाला मान्यता सरकारने मान्यता दिली आहे.    

 


राज्यभरातून यंदा १२० शेतकरी आणि ६ अधिकारी परदेश दौऱ्यावर जातील. दौऱ्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कृषी विभागाच्या आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ही योजना राबविण्यासाठी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक तथा नोडल अधिकाऱ्याची संवितरण अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे अवर सचिव महेंद्र घाडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.