सोशल सर्व्हिस लीगचा शतकोत्तर ११३ वा वर्धापन दिन साजरा

Santosh Gaikwad March 22, 2024 07:53 PM


मुंबई : सोशल सर्व्हिस लीग या संस्थेचा शतकोत्तर ११३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे एनकेजीएसबी बँकेचे उपाध्यक्ष शांतेश वर्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमासाठी माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आणि मास्टरशेफ स्वानिल वाडेकर हे देखील उपस्थित होते. 


वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या विविध विभागातील २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षक व विशेष कर्मचारी पुरस्कारही देण्यात आला. समाजकार्याचा वसा घेतलेल्या १९२५ साली सुरु झालेल्या भारतातील पहिल्या नाम जोशी समाजकार्य वर्गाने शंभरावी पार केल्याबद्दल या प्रशिक्षण वर्गाच्या प्रमुख प्राजक्ता सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.


इतिहासात अभ्यासलेल्या महनीय व्यक्तिंनी या संस्थेत काम केले आहे म्हणून या संस्थेत पाहुणा म्हणून सन्मान होणे ही भाग्याची गोष्ट आहे असे शांतेश वर्टी यांनी आपल्या भाषणात म्हणाले. संस्थेच्या पुनर्बाधणीच्या कामात सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. संस्थेच्या यशामागे हातभार असलेल्या सर्व व्यक्तींचे संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे विजय वर्टी, प्रकाश कोंडुरकर, उमा शेट्ये, मदन देसाई, हेमंत सामंत उपस्थित होते. संस्थेच्या नवीन उपक्रमांची माहिती सीबीएसईच्या मुख्याध्यापिका अपेक्षा चौधरी यांनी दिली. अखेरीस संस्थेच्या सेमी इंग्रजी व सीबीएसई शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रम अधिक रंजक केला या सोहळ्याची सांगता मुख्याध्यापक दिलीप पांचांगणे यांच्या आभार प्रदर्शनाने व राष्ट्रगीताने झाली.