जय भवानी हा शब्द गीतातून काढणार नाही, उध्दव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

Santosh Gaikwad April 21, 2024 07:43 PM


मुंबई- शिवसेना ठाकरे पक्षाच्या मशाल गीतातील  'हिंदू' आणि 'जय भवानी' हे दोन शब्द काढण्याची नोटीस उध्दव ठाकरे यांना बजावली आहे. मात्र  जय भवानी हा शब्द गीतातून काढणार नाही असा थेट इशाराच  ठाकरे यांनी दिला आहे. आम्ही जय भावनी म्हटलं तर धार्मिक प्रचार होतो मग मोदी शहा जय बजरंगबली म्हणतात ते कसं चालत ? असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला आहे. 

उध्दव ठाकरे म्हणाले की, आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये 'जय भवानी, जय शिवाजी' असं एक कडवं आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढण्याचा फतवा निवडणूक आयोगाकडून काढण्यात आला आहे. पण, आम्ही कोणत्याही परिस्थितीत भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर मोदी-शहा यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात का ? हे आम्हाला सांगावं. मोदी-शहांमध्ये महाराष्ट्रातील देवांबाबत इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असं ते म्हणाले आहेत.

अमित शहा म्हणतात निवडून आल्यानंतर अयोध्येचे दर्शन घडवू. पंतप्रधान मोदी म्हणतात बजरंग बलीचे नाव घेऊन बटन दाबा. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. पण आयोगाने आम्हाला उत्तर दिलं नाही. तसा नवा नियम केला असेल तर आम्हीही असा प्रचार केला तर तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली ते आधी सांगा असं ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी कुलदैवत आहे. तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आर्शीवाद दिला आहे. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा लोकांच्या मनामनात आहे असेही उध्दव ठाकरे म्हणाले.