राजकारण पेटलं : कलंक वरून ठाकरे विरूध्द फडणवीस !

Santosh Gaikwad July 11, 2023 05:50 PM


मुंबई :  माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नागपूर येथील जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. या सभेत उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं.   'कलंक'च्या टीकेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे, या टीकेनंतर भाजपचे नेते उध्दव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारीही ठाकरे यांनी कलंक टीकेवर ठाम राहिल्यानंतर ठाकरे विरूध्द फडणवीस सामना रंगल्याचे दिसून आले. 


  उद्धव ठाकरे हे  विदर्भ दौ-यावर असतानाच सोमवारी  देवेंद्र फडणवीस यांचे होम पीच असणा-या नागपुरात जाहीर सभेत घेत ठाकरे यांनी  फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.  आपण कधीही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, वेळ पडल्यास सत्तेत बाहेर राहू असे वक्तव्य करणारी फडणवीसांची ऑडिओ क्लिप देखील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी ऐकवून दाखवली. त्यानंतर बोलतांना, “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा”, अशा खोचक शब्दांत फडणवीस यांच्यावर टीका केली. कलंक या शब्दावरून सध्या महाराष्ट्रात भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात  राज्यभर निषेध केला जात आहे. नागपूरसह अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन करत आहेत.   भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी कलंकीत करंटा व्यक्ती म्हणजे उध्दव ठाकरे अशी टीका त्यांनी केली आहे.  प्रवीण दरेकर यांनी ठाकरे घराण्यावर कलंक असल्याची टीका उध्दव ठाकरेंवर केली आहे. 


उध्दव ठाकरे वक्तव्यावर ठाम 


कलंक या शब्दामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं असताना उद्धव ठाकरे यांनी आज (११ जुलै) दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं.  मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तुम्ही एखाद्या माणसला भ्रष्ट म्हणता, त्यावेळी कलंक लावत नाही का ? तुम्ही भ्ष्टाचाराचे आरोप करुन एखाद्याला कलंकित करता. नंतर त्याला मंत्रिमंडळात स्थान देता, मग त्याने समाजात वावरायच कसं? माझा कलंक शब्द इतका परिणामकारक ठरेल असं वाटलं नव्हतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या तब्येतीवर हे बोलले. माझ्या ऑपरेशनवर खिल्ली उडवली. माझ्या मानेच्या पट्ट्यावर ते गेले. मी जे भोगले त्यांना भोगावे लागून नये. पण त्यांना जेव्हा भोगावं लागेल तेव्हा त्यांना हा त्रास कळेल. पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाता. मला जे बोलता ते चालतं का? कुणाच्या तब्येतीवर, कुटुंबावर बोलता. त्यामुळं माझं म्हणणं आहे ही लोकं कलंक आहेतच. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही लोकं कलंक आहेत, असं उद्धव ठाकरे  यांनी म्हटलं. मोदींना आता पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार मिळणार. मग 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच काय झालं? चक्की पिसिंग म्हणून अजितदादांना लावलेल्या कलंकाच काय झालं ? घराघरात तुम्ही ईडी, सीबीआय घुसवता मग ते कुटुंब कलंकित होत नाही का. आम्ही तुम्हाला काही बोललो किंवा नुसती जाणीव करुन दिली तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाण्याचं कारण काय? त्यामुळे तुमच्याकडील आरोप पहिले थांबवा. तुम्ही सत्तेचा गैरवापर करुन त्रास देता. त्यानंतर त्यांना तुम्ही मानाचं पान वाटता, ही कुठली संस्कृती आहे? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

 

फडणवीसांचे प्रतिउत्तर ...


दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपा नेते, पदाधिकारी उत्तर देत आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला आहे असं दिसतंय. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यांची मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मानसिक स्थितीवर, व्यवहारावर मला दया येतेय. त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला हवं.



कलंकवरून ट्विटर युध्द रंगल ....


सोमवारी फडणवीस यांनी ठाकरेंच्या कलंकित टीकेल  ट्विटरवर प्रतिउत्तर दिले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले होते त्यामुळे ट्विटरवरही कलंकवरून युध्द रंगल्याचे दिसून आले. 


 फडणवीसांकडून उत्तर ... 

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना 'कलंक' असल्याचे वक्तव्य केल्यावर यावर उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, ‘कलंकीचा काविळ’.... ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक, आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक...  सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!, सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक... ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक... पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक... कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक... लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक... असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर मानोसपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल असे फडणवीस म्हणाले. 


अंबादास दानवेंकडून प्रतिउत्तर...

फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरला दानवे यांनी प्रतिउत्तर देतांना म्हटले आहे की, कावळ्यांची काविळ!... ज्यांच्या विरुद्ध लढून तुमच्या पक्षाचा पाया मजबूत केला अशा गोपीनाथ मुंडे यांच्या लढ्याला तिलांजली देऊन त्यांचे राजकीय वैरी फोडाफोडीने जवळ करणे, याला म्हणतात कलंक...'मन की बात' उर्दूतून प्रसिद्ध करणे, मशिद भ्रमण करणे आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्वाचा पाईक म्हणणे, याला म्हणतात कलंक... समुद्रात झेप घेऊन मर्सिलिस बंदर गाठणाऱ्या वीर सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार न देणे, याला म्हणतात कलंक... राम मंदिर आंदोलनात कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीला 'पद्मविभूषण' देणे, याला म्हणतात कलंक..... आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे, वारकऱ्यांवर लाठ्या चालवणे, याला म्हणतात कलंक....  महाराष्ट्रातून दरदिवशी 70 महिला बेपत्ता होतात आणि त्यांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश येत नाही, हा आहे कलंक... कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार न करता त्यांचे शव गंगेत वाहू देणे, पीएम केअर फंडाचा हिशेब जनतेपुढे न ठेवणे, याला म्हणतात कलंक... कोरोना महामारी शिखर गाठत असताना पश्चिम बंगालसारख्या दाट लोकसंख्येच्या राज्यात हट्टीपणाने निवडणुकांच्या प्रचारसभा घेणे, परिस्थिती अनुकूल नाही म्हणून महाराष्ट्रात निवडणूका न घेणे, याला लोकशाहीवर कलंक म्हणतात.... कलंक नसताना तो दिसणे त्याला नजरेतील दोष म्हणतात, दिसून न दिसल्यासारखं करणे त्याला ढोंगीपणा म्हणतात. उपचार आता भाजपवर होतील आणि ते जनताच करणार आहे. त्रिशूळ असल्याचे सोंग तुम्ही आणता, मात्र तिसरा डोळा मतदारांकडेच आहे. ते योग्यवेळी तो उघडतील आणि कलंक पुसतील, असे दानवे म्हणाले. 


-------------------------------