इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह मिळून यशस्वी करू: नसीम खान

Santosh Sakpal July 22, 2023 09:33 PM


मुंबई : केंद्रातील हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने लोकशाही मानणा-या २६ समविचारी पक्षाची इंडिया आघाडी केली आहे. देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असून काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून ही बैठक यशस्वी करू असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.

गुरुवारी विधिमंडळ आवारात माध्यमांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, भारत देश, देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांना सोबत घेऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली होती. दुसरी बैठक बंगळुरु येथे पार पडली असून या बैठकीत इंडिया हे नाव ठरले आहे.

या इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत घेण्याचे बंगळुरु येथील बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब असून काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून ही बैठक यशस्वी करतील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.